![]()
पुणे पोलिसांनी केतन अग्रवाल खून प्रकरणात ५ हजार पानांचे दोषारोपपत्र वडगाव मावळ न्यायालयात दाखल केले आहे. लोहगड परिसरात केतन अग्रवाल यांचा मृत्यू अपघाती नसून पूर्वनियोजित कट रचून त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हंगे यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाले आहे. केतन अग्रवाल यांचा १८ जून रोजी लोहगड परिसरात मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा उंच कड्यावरून पडून झालेला अपघात वाटत होता. मात्र, तपासात पोलिसांना काही गोष्टींवर संशय आला. त्यानंतर मोबाईल संभाषण, संपर्काचे तपशील, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. पोलिसांनुसार, केतन यांच्या मृत्यूमागे पूर्वनियोजित कट होता, हे तपासात समोर आले. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचा या कटात थेट सहभाग असल्याचा पोलिसांचा दावा आहे. रितेश हंगे घटनास्थळी नसतानाही सिया आणि चेतन यांच्या संपर्कात होता. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचीही कटातील भूमिका तपासण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. तपासादरम्यान पोलिसांनी अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईलमधील संभाषणे, संपर्काचे तपशील आणि इतर डिजिटल पुरावे गोळा केले. या पुराव्यांच्या आधारे आरोपींमधील संपर्क आणि कटाची साखळी न्यायालयासमोर मांडण्यात आली आहे. रितेश हंगे याला १७ सप्टेंबर रोजी वडगाव मावळ न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. आता ५ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल झाल्यामुळे या प्रकरणाच्या पुढील न्यायालयीन प्रक्रियेला वेग येईल अशी शक्यता आहे. दोषारोपपत्रातील पुराव्यांच्या आधारे न्यायालयात आरोप निश्चिती होईल आणि त्यानंतर खटल्याची प्रक्रिया सुरू होईल.
Source link
केतन अग्रवाल खून प्रकरणात 5 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल:लोहगडमधील मृत्यू अपघाती नसून पूर्वनियोजित हत्या; 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल