![]()
खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात प्रगती करताना शिक्षण, कौशल्य विकास आणि भविष्यातील नोकरीच्या संधींचाही गांभीर्याने विचार करावा. क्रीडा कारकिर्दीसोबतच पर्यायी करिअरची तयारी केल्यास भविष्यात अनेक क्षेत्रांमध्ये संधी मिळू शकतात, असे क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांनी सांगितले. विभागीय क्रीडा संकुलातील निवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागाने ‘लोकसंवाद’ कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी माहिती उपसंचालक प्रवीण टाके, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, क्रीडा प्रबोधिनीच्या प्राचार्य पूनम नवगिरे आणि सहाय्यक संचालक सुरेश पाटील उपस्थित होते. क्रीडा उपसंचालक पाटील म्हणाले की, खेळाडूंनी उपलब्ध प्रशिक्षण आणि सुविधांचा चांगला वापर करून आपले क्रीडा कौशल्य सतत वाढवावे. स्पर्धांमधून मिळणारा अनुभव, शिस्त, संघभावना आणि नेतृत्व गुण भविष्यात अनेक क्षेत्रांमध्ये उपयोगी पडतात. क्रीडा क्षेत्रातील अनुभवाच्या आधारे प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक, शरीरविज्ञान आणि पुनर्वसन यांसारख्या क्षेत्रांमध्येही करिअरच्या संधी आहेत. तसेच, खेळाडू आरक्षणातून सरकारी नोकरीत मिळणाऱ्या संधींची माहिती घेऊन त्यासाठी आवश्यक तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले. ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात पत्रकारितेतील विविध संधी या विषयावर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरमध्ये या माहितीचा उपयोग करावा. क्रीडा आणि माध्यम क्षेत्रातील शिक्षण आपले व्यक्तिमत्व आणि कौशल्य वाढवू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. माहिती उपसंचालक प्रवीण टाके यांनी माध्यम क्षेत्रातील संधींबद्दल माहिती दिली. क्रीडा क्षेत्रात करिअर करताना पत्रकारिता आणि जनमाध्यमातील वेगवेगळ्या संधींबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. क्रीडा पत्रकारिता, समालोचन, जनसंपर्क, संहिता लेखन, जाहिरात आणि डिजिटल माध्यम (मोबाईल जर्नालिझम) अशा अनेक क्षेत्रांमध्ये खेळाडू अतिरिक्त कौशल्य म्हणून प्राविण्य मिळवू शकतात, असे त्यांनी सांगितले. डॉ. दुसाने म्हणाले की, खेळाडूंनी खेळासोबत शिक्षणालाही सारखेच महत्त्व द्यावे. क्रीडा कारकिर्दीला एक विशिष्ट वयोमर्यादा असते, त्यामुळे पुढील शिक्षणाबद्दल योग्य वेळी निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. अकरावी-बारावीनंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, संगणक, कृषी, कला आणि पत्रकारितेतील विविध संधी व अभ्यासक्रमांची माहिती घेऊन आपल्या आवडीनुसार करिअरची दिशा ठरवावी. छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा उपसंचालक कार्यालय, माहिती उपसंचालक आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्यामार्फत या ‘महासंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Source link
खेळाडूंनी क्रीडा कौशल्यासोबत शिक्षण आणि करिअरची तयारी करावी:क्रीडा उपसंचालक शेखर पाटील आणि डॉ. दुसाने यांचा खेळाडूंना सल्ला