Headlines

'ग्रामसभा वाचवा' महाराष्ट्रव्यापी आंदोलन:वाघोळा येथे तिसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरू; काही आंदोलकांची प्रकृती खालावली




‘ग्रामसभा वाचवा- महाराष्ट्रव्यापी आंदोलन’ अंतर्गत वाघोळा (तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे आमरण उपोषण सुरू झाले आहे. 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी या उपोषणाला सुरुवात झाली. आज तिसरा दिवस असून, काही आंदोलकांची प्रकृती बिघडली आहे. ग्रामपंचायत स्तरावरील सर्व 20 कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करावी आणि त्यानुसारच त्यांचे वेतन द्यावे, ही आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. यासह एकूण 15 मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. विकास शेषराव पाटील गायकवाड, श्रीमत साहेबराव पाटील गायकवाड आणि इतर ग्रामस्थांनी हे उपोषण सुरू केले आहे. श्री गणराय, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. ग्रामसभा ही ग्रामविकासाची खरी लोकशाही व्यवस्था आणि गावकऱ्यांच्या हक्काचे व्यासपीठ आहे. सध्या ग्रामसेवक संघटनेच्या आंदोलनामुळे ग्रामसभा घेण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामस्थ आपल्या गावातील विकासकामे, निधीचा वापर आणि योजनांच्या अंमलबजावणीबाबत ग्रामसभेत प्रश्न विचारतात. हे प्रश्न प्रशासनासाठी अडचणीचे ठरू शकतात, मात्र प्रश्न विचारले जात आहेत म्हणून ग्रामसभा थांबवणे हा उपाय होऊ शकत नाही. लोकसभेत खासदार आणि विधानसभेत आमदारांना प्रश्न विचारण्यासाठी पूर्वसूचना देण्याची पद्धत आहे. त्याच धर्तीवर ग्रामस्थांनी ग्रामसभेत विचारायचे प्रश्न काही दिवस अगोदर लेखी स्वरूपात सादर करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यामुळे प्रशासनाला आवश्यक माहिती तयार ठेवता येईल आणि ग्रामसभेत प्रश्नांना व्यवस्थित उत्तरे देता येतील. यामुळे ग्रामसभा अधिक शिस्तबद्ध होण्यास मदत होईल. या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक मागण्या शासनासमोर ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये ग्रामसभा रद्द होऊ नये, ग्रामसभेतील प्रश्नांना योग्य उत्तरे मिळावीत, ठरावांवर ऑनलाइन कार्यवाहीची माहिती उपलब्ध व्हावी, ग्रामपंचायतींचे सामाजिक लेखापरीक्षण व्हावे आणि ग्रामसेवकांच्या कामकाजासाठी स्वतंत्र वेळबद्ध नागरिक तक्रार व्यवस्था निर्माण करावी, या मागण्यांचा समावेश आहे. यासोबतच वाघोळा-पोफळा ग्रुप ग्रामपंचायतीतील विकासकामे व निधीच्या वापराबाबत निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि खर्चाची संपूर्ण माहिती ग्रामस्थांसमोर पारदर्शकपणे मांडण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांसंदर्भात शासनाला निवेदन दिले आहे. ग्रामसभा ही गावातील प्रत्येक नागरिकाची लोकशाही संस्था आहे. त्यामुळे हा लढा केवळ वाघोळ्यापुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील ग्रामसभेचा अधिकार अबाधित राहावा यासाठीचा आहे. या ‘ग्रामसभा वाचवा – महाराष्ट्रव्यापी आंदोलनाला’ राज्यातील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी शांततामय मार्गाने पाठिंबा द्यावा, असे आवाहन विकास पाटील गायकवाड व सचिन श्रीमत पाटील गायकवाड यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *