Headlines

शेतकऱ्यांना महागाई निर्देशांकानुसार कर्जमाफी द्या:दुष्काळ जाहीर करण्याचीही बाळासाहेब थोरात यांची मागणी; ‘वीज-पाण्यासाठी पुन्हा संघर्षाची वेळ’‎




महागाईच्या वाढत्या ताणामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असून, महागाई निर्देशांकाचा विचार करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. थोरात म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था शेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. मान्सूनवर शेअर बाजारापासून ग्रामीण अर्थव्यवस्थेपर्यंत परिणाम होतो. खतांच्या वाढलेल्या किमती आणि शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून सरकारने दुष्काळ जाहीर करावा. २०१९ मध्ये आमच्या सरकारने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली होती. त्याच धर्तीवर सध्याच्या महागाईचा विचार करून सरकारने कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. संगमनेर तालुक्यातील सहकारी संस्थांचा कारभार नियोजनबद्ध व पारदर्शक पद्धतीने सुरू असून, त्यांच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाला हातभार लागला आहे. सोशल मीडियावरून पत्रकार परिषदा घेऊन संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप करत, अशा प्रकारांना कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याचे आवाहन त्यांनी केले. अमृतवाहिनी बँकेच्या माध्यमातून सामान्य शेतकरी व कामगारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम सुरू असल्याचेही थोरात म्हणाले. सध्या पिकांना पाण्याची गरज असताना वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू आहे. हक्काच्या पाणीप्रश्नासाठी पुन्हा संघर्ष करावा लागणार असून, २२ सप्टेंबरच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. चेअरमन सुधाकर जोशी यांनी बँकेमार्फत अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजना सुरू असल्याचे सांगितले. सभेत पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. ‘पद्मश्री माझा नाही, संगमनेरचा’ ‘‘कोरोना काळात तमाशा कलावंतांवर मोठे संकट आले होते. त्या काळात बाळासाहेब थोरात यांनी आम्हा कलावंतांना मदत केली. हे आम्ही विसरणार नाही. मला मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा माझा नसून संपूर्ण संगमनेर तालुक्याचा आहे,’’ असे पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी सांगितले. त्यांच्या वक्तव्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *