Headlines

पिंपरी-चिंचवड आरटीओची परराज्यातील 66 लक्झरी बसवर कारवाई:21 दिवसांत 13.74 लाखांचा दंड आकारला; 10.56 लाख रुपये वसूल




पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) परराज्यात नोंदणी असलेल्या लक्झरी बसविरोधात विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 66 बसवर कारवाई करण्यात आली. 1 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 2026 या 21 दिवसांच्या कालावधीत ही मोहीम चालली. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून इतर राज्यांत प्रवासी वाहतूक करणाऱ्या या बस नियमांचे पालन करतात की नाही, हे तपासणे हा मोहिमेचा उद्देश होता. तपासणीदरम्यान अनेक नियमभंग समोर आले. यामध्ये अग्निशामक यंत्र नसणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) संपलेले असणे, उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकपट्टी (HSRP) नसणे, परवाना नसणे, प्रथमोपचार पेटी नसणे, मालाची वाहतूक करणे, अनुज्ञप्ती नसणे आणि वाहनात अवैध बदल करणे यांचा समावेश होता. या कारवाईत एकूण 13 लाख 74 हजार 370 रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्यापैकी 10 लाख 56 हजार 870 रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे. या विशेष तपासणी मोहिमेत आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी सहभाग घेतला. पिंपरी-चिंचवड आरटीओने आवाहन केले आहे की, परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या आणि महाराष्ट्रातून इतर राज्यांत प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व लक्झरी बसच्या चालक व मालकांनी वाहनांची कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत. त्यांनी वैध परवाना आणि योग्यता प्रमाणपत्र बाळगावे, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *