![]()
अमरावती शहरातील अंबागेटच्या आतील जुन्या भागात असलेल्या श्री लक्ष्मीकांत गणेशोत्सव मंडळाची ओळख संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपणारे मंडळ अशी आहे. हे मंडळ आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत असून, लोकसेवेचा वसा त्यांनी उचलला आहे. लक्ष्मीकांत मंडळ दरवर्षी रक्तदान, आरोग्य तपासणी आणि रोगनिदान शिबिरे आयोजित करते. तरुण पिढीला खेळांमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, पोहणे, वॉटर पोलो आणि कुस्ती यांसारख्या खेळांचे आयोजनही केले जाते. मंडळाच्या खेळाडूंनी स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश मिळवून विदर्भाचे नाव मोठे केले आहे. याशिवाय, सांस्कृतिक क्षेत्रात रांगोळी स्पर्धा आणि १०० मीटर धावण्याच्या शर्यती आयोजित करून मंडळाने स्थानिक कलागुणांना व्यासपीठ दिले आहे. हे मंडळ स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा ऐतिहासिक वारसा जपत आहे. अंबागेटच्या आतील सर्वात जुन्या मंडळांपैकी हे एक आहे. यावर्षी मंडळ स्थापनेचे १२१ वे वर्ष साजरे करत आहे. स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतल्यापासून आजपर्यंत हे मंडळ फक्त धार्मिक उत्सवांपुरते मर्यादित राहिलेले नाही. आरोग्य, क्रीडा, शिक्षण आणि सामाजिक उपक्रमांमधून ते सतत समाजसेवा करत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन या मंडळाने नेहमीच सामाजिक संस्कृतीचा वारसा जपला आहे. यावर्षी ‘अरण्य नटराज गुफा’ हा देखावा सादर करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष विलास इंगोले, कार्याध्यक्ष राजाभाऊ याऊल, उपाध्यक्ष मनोज भेले, कोषाध्यक्ष मनोज हिवसे, सचिव जितेंद्र भेले, सौरभ याऊल, उमेश शिष्टे, मनीष भुतडा आणि राहुल चौधरकर हे आहेत. स्वागताध्यक्ष डॉ. अशोक लांडे, सहकोषाध्यक्ष शेखर ताकपिरे, सहसचिव डॉ. निलेश सोळंके, अतुल देशमुख, निलेश लामकाने, आशिष लाड, चेतन याऊल, आदित्य हिवसे आणि पंकज गनथडे यांच्यासह कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व सदस्य या उपक्रमांसाठी मेहनत घेत आहेत. या गणपतीला ‘हाडपक्या गणपती’ असेही म्हटले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘भारत छोडो’ आंदोलनादरम्यान अंबागेटच्या आत संचारबंदी लागू होती. त्यामुळे गणपतीचे विसर्जन वेळेत होऊ शकले नाही. परिणामी, दोन महिने श्रींची मूर्ती एकाच ठिकाणी होती. त्यानंतर, पोलीस बंदोबस्तात ‘हाडपक्या’च्या काळात विसर्जन करण्यात आले. तेव्हापासून या गणपतीला ‘हाडपक्या गणपती’ म्हणून ओळखले जाते. या मंडळाची स्थापना १९०६ मध्ये लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने झाली. महान समाजसेवक पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन, वीर वामनराव जोशी, बापूसाहेब कारंजकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे मंडळ सुरू केले. १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनादरम्यान तणावपूर्ण परिस्थिती असतानाही या मंडळाने गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली.
Source link
लक्ष्मीकांत गणेशोत्सव मंडळातर्फे कबड्डी, जलतरण स्पर्धांसह रक्तदान शिबिर:अंबागेट येथील मंडळाची 121 वर्षांची परंपरा, आरोग्य व क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान