![]()
जोरन सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या किकवारी खुर्द, किकवारी बुद्रुक, तळवाडे तसेच परिसरातील गावांमध्ये दोन महिन्यांपासून वारंवार खंडित होणारा थ्री-फेज वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि. २२) जोरन सबस्टेशन येथे आंदोलन केले. किकवारी खुर्द शिवारातील ४२ एकर खासगी जमीन सौरऊर्जा प्रकल्पासाठी देण्यात आली आहे. परिसरातील ग्रामस्थांनी प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून दिली असतानाही त्याच भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा नियमित मिळत नसल्याने संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांनी शेतीसाठी दिवसा सलग आठ तास थ्री-फेज वीजपुरवठा मिळावा, वारंवार होणारे वीजपुरवठ्याचे ट्रिपिंग थांबवावे, नवीन घरगुती वीजमीटरसाठी ग्राहकांवर नवीन पोल घेण्याची सक्ती करू नये, अशा मागण्या मांडल्या. दरम्यान, सटाणा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता डी. एम. पाटील व कनिष्ठ अभियंता एस. आर. धनवटे यांनी जोरन येथे आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश काकुळते, विश्वास खैरनार, पोपट काकुळते, दीपक काकुळते, वैभव काकुळते आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
Source link
किकवारी व तळवाडेत वीजपुरवठा खंडित:दाेन महिन्यांपासून वारंवार विजेचा लपंडाव सुरू असल्याने जोरन सबस्टेशनवर शेतकऱ्यांचे आंदोलन