![]()
शहर परिसरात मंगळवारी (दि. २२) दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे अर्धा तास पावसाच्या मध्यम व जोरदार स्वरूपाच्या सरी कोसळल्या. यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण होऊन उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाला. अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मंगळवारी सकाळपासून वातावरणात उष्मा जाणवत होता. दुपारी दोन वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा ते पाऊण तास पावसाच्या मध्यम व जोरदार सरी कोसळत होत्या. रस्त्यांवरील उंच सखल भागात पाणी साठले होते. प्रतिनिधी | येवला दीड महिन्याच्या कालखंडानंतर शहरासह तालुक्यात मंगळवारी दुपारनंतर पावसाने दीड महिन्यानंतर १५ मिनिटे हजेरी लावली. सकाळी शहरात काही अंतराच्या फरकाने पाऊस व उन्हाचे परस्परविरोधी चित्र पाहायला मिळाले. विंचूर चौफुली परिसरात झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले. आठवडे बाजार असल्याने विक्रेत्यांची पावसाने धावपळ उडाली. तालुक्याच्या पूर्व भागात मात्र दिवसभर वातावरणात उष्णता जाणवत होती. अनेक भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले, पावसाची शक्यता वाटत होती; मात्र पावसाने हुलकावणी दिली. प्रतिनिधी | लासलगाव शहर व परिसरात मंगळवारी तब्बल ४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दोन-अडीच महिन्यांपासून पावसाने उघडीप दिल्याने पिके संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी ६ जून रोजी ४९ मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर परिसरात तुरळक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. लासलगाव व परिसरात जून महिन्यात सुमारे ४०५ मिलीमीटर पावसाची नोंद लासलगाव बाजार समितीमध्ये असलेल्या पर्जन्यमापकात झाली होती. मात्र, त्यानंतर पावसाने दीर्घ उघडीप घेतल्याने विशेषतः मका आणि सोयाबीन पिकांवर मोठा परिणाम झाला. पिकांना पावसाची अत्यंत गरज असताना पाऊस न झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंगळवारी झालेल्या ४२ मिलिमीटर पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढण्यास मदत होणार असली, तरी आधीच पावसाअभावी ताणलेल्या मका व सोयाबीन पिकांचे काही ठिकाणी नुकसान होण्याची भीती कृषी जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे पावसाने दिलासा दिला असला तरी उत्पादनावर परिणाम होण्याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये कायम आहे.
Source link
दाेन महिन्यांनंतर लासलगावी 42 मिलीमीटर पाऊस:तासभर झालेल्या पावसाने मका-सोयाबीनला दिलासा, मात्र उत्पादनावर परिणाम होण्याची धास्ती