Headlines

गणेशोत्सवात दोन गटांत जोरदार राडा:मारहाण, विनयभंगाच्या तक्रारी, 21 जणांवर गुन्हा




गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील मध्यवर्ती भागात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही गटांकडून शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, मारहाण, विनयभंग आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात तब्बल 21 जणांविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 सप्टेंबर रोजी हा वाद उफाळून आला. एका गटातील महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, त्या आपल्या नातेवाईक महिलेसोबत दुचाकीवरून जात असताना काही जणांनी त्यांना रस्त्यात अडवले. यावेळी संशयितांनी अश्लील शेरेबाजी करत महिलांना त्रास दिला आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. महिलांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर त्यांचे नातेवाईक घटनास्थळी आले. त्यावेळी वाद वाढला आणि संशयितांनी महिलांच्या नातेवाईकांवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आधीच्या वादानंतर पुन्हा हाणामारी दुसऱ्या गटाकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, 25 सप्टेंबर रोजी तक्रारदाराच्या पुतण्याला आणि एका नातेवाईकाला काही जणांनी कोणतेही कारण नसताना मारहाण केली होती. यावेळी त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. नागरिक आणि पोलिसांनी मध्यस्थी करून त्यावेळी वाद मिटवला होता. त्यानंतर पुतण्या आणि नातेवाईक घरी गेले. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी पुन्हा काही जणांचा जमाव आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या जमावाने लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच कुटुंबातील महिलांशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिसांकडून तपास सुरू या घटनेप्रकरणी दोन्ही गटांकडून शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मारहाण, विनयभंग आणि धमकीच्या आरोपांवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गणेशोत्सवाच्या काळात शहराच्या मध्यवर्ती भागात दोन गटांमध्ये झालेल्या या वादामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेमागील नेमके कारण आणि वादाला सुरुवात कशामुळे झाली, याचा पोलीस तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *