![]()
अमरावती विभागाच्या शिक्षक मतदारसंघात २६ सप्टेबरपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. या तारखेपर्यंत नोंदणी केलेल्या पात्र मतदारांना आगामी निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार मिळेल. त्यामुळे निवडणुकीतील एकूण मतदारसंख्या २७ सप्टेबर रोजी स्पष्ट होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी बुधवारी दिली. विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर नयना गुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, मतदारांची एकूण संख्या स्पष्ट झाल्यावर पुढील एक-दोन दिवसांत मतदान केंद्रांची संख्या आणि यादी जाहीर केली जाईल. गेल्या निवडणुकीत ३५ हजार ६२२ मतदार होते आणि त्यांच्यासाठी ७७ मतदान केंद्रे होती. यावेळी मतदारांच्या संख्येनुसार मतदान केंद्रे निश्चित केली जातील. मतदाराला १६ किलोमीटरपेक्षा जास्त लांब जावे लागू नये, यासाठी त्याच्या राहत्या ठिकाणापासून १६ किलोमीटरच्या आतच मतदान केंद्र उपलब्ध करून दिले जाईल. या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर केला जात नाही. मतपत्रिकेवर ‘नोटा’ (NOTA) चा पर्यायही नसतो. उमेदवाराच्या निवडणूक खर्चावर कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. गुंडे यांनी स्पष्ट केले की, किमान ३० मतदारांसाठी एक मतदान केंद्र असेल. मात्र, मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल मर्यादा किती असावी, याबाबत आयोगाने स्पष्टता दिलेली नाही. पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांतील ५६ तहसीलदार, २७ एसडीओ, काही उपजिल्हाधिकारी आणि पाचही जिल्हाधिकारी या निवडणुकीत विविध जबाबदाऱ्या सांभाळतील. स्थानिक पातळीवर अपर आयुक्त संजय जाधव हे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या खुल्या संवर्गातील उमेदवाराला १० हजार रुपये, तर राखीव संवर्गातील उमेदवाराला ५ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागेल. यावेळी अपर आयुक्त संजय जाधव, निवडणूक उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, तहसीलदार श्याम देशमुख, माहिती उपसंचालक अनिल आलुरकर आणि माहिती अधिकारी रितेश भुयार उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदार म्हणून नोंदणी करणाऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला जातो. त्यामुळे २६ सप्टेबर ही मतदार नोंदणीची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
Source link
अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक: 26 सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत, 27 ला:‘नोटा’ पर्याय नाही, खर्चाला मर्यादा नाही; सध्या 33,964 मतदार