![]()
अचलपूर तालुक्यातील आरेगाव येथे ५ लाख रुपये आणि मोटारसायकलच्या हुंड्यासाठी एका विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. तिला बेदम मारहाणही करण्यात आली. या प्रकरणी पथ्रोट पोलिसांनी पतीसह सासरच्या ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरेगाव येथील रहिवासी असलेल्या या महिलेचा विवाह १२ मे २०१३ रोजी विनोद (नाव बदलले आहे) यांच्याशी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. लग्नानंतर काही काळ सर्व सुरळीत होते. त्यानंतर मात्र सासरच्या मंडळींनी माहेरून ५ लाख रुपये आणण्यासाठी आणि ड्युटीवर जाण्यासाठी गाडी मागून तिचा छळ सुरू केला. १२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजता ‘माहेरून पैसे का आणले नाहीत’ या कारणावरून विनोदने पत्नीचे केस पकडून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी सासू, सासरे, दीर आणि नणंद यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. पतीने आणि दिराने मोबाईल केबल व काचेने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना कळताच पीडित महिलेच्या भावाने डायल ११२ वर फोन केला. त्यानंतर पथ्रोट पोलीस तातडीने मदतीसाठी पोहोचले. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पथ्रोट पोलीस ठाण्यात आरोपी विनोदसह सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ११८(१), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे सर्व आरोपी आरेगाव, ता. अचलपूर आणि आसलगाव, जि. बुलढाणा येथील रहिवासी आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अभय चौधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रवींद्र शिंपी करत आहेत.
Source link
5 लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ:अचलपूर तालुक्यातील आरेगाव येथे पतीसह सासरच्या 6जणांवर गुन्हा दाखल