![]()
अमरावती येथील प्राचीन ‘श्री एकविरा गणेशोत्सव मंडळाने’ यावर्षी मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. मंडळाने केवळ घोषणा किंवा देखावा न करता, प्रत्यक्ष कृती म्हणून एक मराठी शाळा दत्तक घेतली आहे. मंडळाने ‘मराठी पाऊल नक्कीच पुढे पडेल; पण मराठी शाळा वाचल्या तरच ना!’ असा संदेश दिला आहे. अमरावतीकरांनी या उपक्रमाची दखल घेतली असून, मंडळाचे कार्य आणि गणेशोत्सवातील देखावा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अनेक नागरिकांनी मंडळात जाऊन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. अंबादेवी मंदिर परिसरातील श्री एकविरा गणेशोत्सव मंडळाचे हे ५९ वे वर्ष आहे. सन १९६७ मध्ये मंडळाचे संस्थापक विष्णुकांत तमास्कर यांच्या हस्ते श्री एकविरा मंदिरात गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून हे मंडळ केवळ धार्मिक उत्सवच नाही, तर सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक आणि पर्यावरणविषयक उपक्रम राबवत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात मंडळाने तिवसा तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दत्तक घेतले आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह खेळ आणि पर्यावरणपूरक साहित्य देण्यासाठी मंडळ प्रयत्न करत आहे. मराठी शाळांची कमी होणारी संख्या आणि मातृभाषेच्या संवर्धनाची गरज लक्षात घेऊन, समाजात जनजागृती करण्यासाठी मंडळाने विज्ञान प्रदर्शनही भरवले आहे. मराठी शाळा टिकवणे, मराठी भाषा आणि संस्कृती जपण्याची ही काळाची गरज आहे. या भावनेतून श्री एकविरा गणेशोत्सव मंडळाने केलेला हा सामाजिक उपक्रम इतर मंडळांसाठीही एक चांगला आदर्श ठरत आहे. श्री एकविरा गणेशोत्सव मंडळाला त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी आतापर्यंत ३० हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. दरवर्षी महाराष्ट्र शासन आणि अमरावती महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाच्या पुरस्कारांवर या मंडळाने आपले नाव कोरले आहे. ही पुरस्कारांची परंपरा मंडळाच्या पर्यावरणपूरक आणि समाजोपयोगी कार्याची ओळख आहे.
Source link
एकविरा गणेशोत्सव मंडळाने मराठी शाळा दत्तक घेतली:त्यांचा देखावा अमरावतीकरांच्या चर्चेचा विषय, 30 हून अधिक पुरस्कार मिळाले.