![]()
नागपूरमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये व्यावसायिक गॅसऐवजी घरगुती गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांवर धंतोली पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी आणि पुरवठा विभागाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. धंतोलीतील राजकमल कॉम्प्लेक्समध्ये आयोजित गणेश महाप्रसादाच्या कार्यक्रमात घरगुती सिलिंडरचा वापर झाल्याचे आढळून आले. राजकमल कॉम्प्लेक्समधील एका कार्यालयाने गणपती महाप्रसादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सुमारे १५० ते २०० लोकांसाठी जेवणाची व्यवस्था होती. ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या स्वयंसेवकांना कार्यक्रमात घरगुती सिलिंडरचा वापर होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ पोलिस आणि पुरवठा विभागाला याची सूचना दिली. माहिती मिळताच धंतोली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली. तिथे त्यांना दोन व्यावसायिक सिलिंडरसोबत एक घरगुती गॅस सिलिंडर आणि एक मोठी शेगडी मिळाली. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जेवण बनवण्यासाठी घरगुती सिलिंडर वापरल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पुरवठा विभागाचे सहाय्यक पुरवठा अधिकारी पंकज जळेकर आणि पुरवठा निरीक्षक स्नेहल मांगे यांनी आयोजक आणि कॅटरर्सविरुद्ध तक्रार दिली. कॅटरर्स प्रदीप दुबे यांचे नाव या प्रकरणात नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक शुभम बकाल यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. पोलिस निरीक्षक साईनाथ रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सार्वजनिक उत्सव, महाप्रसाद किंवा इतर मोठ्या कार्यक्रमांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
Source link
नागपुरात महाप्रसादात घरगुती गॅस सिलिंडरचा वापर:आयोजक आणि कॅटरर्सविरुद्ध गुन्हा दाखल, प्रशासनाने दिला कारवाईचा इशारा