Headlines

अमरावतीत बगीया टी-पॉइंटजवळ दुचाकीस्वाराला चाकूचा धाक दाखवून लुटले:तीन अज्ञातांनी 1.99 लाखाचे मोबाईल आणि दुचाकी लंपास केली




अमरावतीच्या जुना बायपास रोडवरील बगीया टी-पॉइंटजवळ तीन अनोळखी व्यक्तींनी एका दुचाकीस्वाराला लुटले. चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील दोन महागडे मोबाईल आणि दुचाकी असा सुमारे १ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन पळ काढला. या प्रकरणी बडनेरा पोलिस ठाण्यात तीन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस सुभाषराव पुनसे (वय २३, व्यवसाय-ड्रायव्हर, रा. अंजनगाव बारी, बारीपुरा) हे पल्सर दुचाकीने अंजनगाव बारीकडे जात होते. बगीया टी-पॉइंटजवळ त्यांच्या दुचाकीला काहीतरी समस्या येत असल्याने ते हळू जात होते. त्याचवेळी चेतक मोपेडवरून आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. आरोपींपैकी एकाने पुनसे यांच्याकडे खर्रा आणि गुटखा आहे का, अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या खिशातील मोबाईल हिसकावून घेतला. एका आरोपीने पुनसे यांच्या गालावर थापड मारली आणि चाकूचा धाक दाखवून पैसे व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले. घाबरलेल्या तेजस पुनसे यांच्याकडून आरोपींनी विवो ई-२९ मोबाईल (किंमत अंदाजे ३० हजार रुपये), आयफोन (किंमत अंदाजे ६९ हजार रुपये) आणि पल्सर दुचाकी क्रमांक एमएच २७-डीएन ५०७० (किंमत अंदाजे १ लाख रुपये) असा एकूण सुमारे १ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. त्यानंतर आरोपी एमआयडीसी अमरावती-जुना बायपासच्या दिशेने पसार झाले. या घटनेनंतर तेजस पुनसे यांनी बडनेरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(३), ३०९(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तेजस पुनसे यांनी आरोपींना तातडीने शोधून अटक करण्याची आणि आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *