![]()
छत्रपती संभाजीनगरमध्ये युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने बुधवारी (२४ सप्टेंबर) जोरदार निदर्शने करण्यात आली. पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, रविवारी बँका चालू ठेवण्याचा निर्णय रद्द करावा आणि पीएलआयबाबतचा भेदभावपूर्ण व एकतर्फी निर्णय मागे घ्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन झाले. जालना रोडवरील बँक ऑफ इंडिया आणि हॉटेल अमरप्रीतसमोर झालेल्या या आंदोलनात ५०० हून अधिक बँक कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. यात महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी काळे कपडे घालून केंद्र सरकार आणि वित्त मंत्रालयाच्या धोरणांचा तीव्र निषेध केला. सुरुवातीला जोरदार घोषणाबाजी करून कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले. बँक कर्मचाऱ्यांचा २८, २९ आणि ३० सप्टेंबर रोजी तीन दिवसांचा संप जवळपास निश्चित मानला जात आहे. या संपाचा परिणाम कमी करण्यासाठी, एटीएममध्ये पुरेसे चलन ठेवण्यासाठी आणि चेक क्लिअरिंगची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी बँका चालू ठेवण्याचा निर्णय वित्त मंत्रालय व आरबीआयकडून घेतल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. कर्मचाऱ्यांचा वापर करून संप मोडीत काढण्याचा हा प्रयत्न असून, यामुळे कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. केंद्रीय व राज्य सरकारी कर्मचारी, आरबीआय, नाबार्ड आणि एलआयसीमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू आहे. मात्र, बँकांमध्ये मनुष्यबळाची मोठी कमतरता असतानाही अतिरिक्त कामाचा ताण आणि सरकारी योजनांच्या अंमलबजावणीची सक्ती केली जात आहे. सकाळी १० ते रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर व वैयक्तिक आयुष्यावर वाईट परिणाम होत आहे. द्विपक्षीय करारात मान्य होऊनही वित्त मंत्रालय जाणीवपूर्वक मंजुरी देत नसल्याचे संघटनांनी सांगितले. पीएलआयबाबत कोणतीही वाटाघाटी न करता सरकारने एकतर्फी निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा डाव असून, हा द्विपक्षीय कराराच्या भावनेचा भंग आहे, असा आरोप संघटनांनी केला. वाटाघाटीतील मान्य मागण्या त्वरित लागू न केल्यास ऑक्टोबर महिन्यात बेमुदत संप पुकारण्याचा इशारा यावेळी दिला. यावेळी महाराष्ट्र स्टेट फेडरेशनचे कैलास कानडे, एनसीबीईचे ललित निकुंभ, मारुती निकम, एआयबीओसीचे गणेश तायडे, अमोल गायके, एनसीबीईचे दिगंबर हरकळ आणि एआयबीओएचे निलेश खरात यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सचिन देशपांडे, कॉम्रेड प्रणव कौशिके, पियुष बिऱ्हाडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र देवळे यांनी केले आणि आभार मानले.
Source link
छत्रपती संभाजीनगरात 5 दिवसांचा आठवडा मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने:रविवारी बँका उघडण्याच्या निर्णयाला विरोध; 28 ते 30 सप्टेंबरला संपाचा इशारा