![]()
अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ, अस्वच्छता आणि आरोग्यास घातक पदार्थांविरोधात कारवाई सुरू आहे. या कारवाईची चर्चा सोशल मीडियापासून बॉलिवूडपर्यंत होत असून, अभिनेत्री प्रीती झिंटा हिने ‘टीम तुकाराम मुंढे’ असा मजकूर असलेला टी-शर्ट परिधान करून त्यांच्या मोहिमेला पाठिंबा दर्शवला होता. याच पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या कामाविषयी आणि मिळत असलेल्या प्रसिद्धीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रकारांनी त्यांना कलाकारांकडून होत असलेल्या कौतुकाबाबत तसेच ‘तुम्हाला कोणाची नजर लागू नये’ अशा शुभेच्छांबाबत प्रश्न विचारला. ‘नजर लागण्यावर माझा विश्वास नाही’ यावर तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मला कुणाची नजर लागेल यावर माझा विश्वास नाही.” त्यांच्या मते, अशा गोष्टींपेक्षा सध्या ज्या मूळ समस्येवर काम सुरू आहे, त्याकडे लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे. भेसळयुक्त आणि असुरक्षित अन्नपदार्थ तसेच बनावट किंवा अयोग्य औषधांच्या विक्रीवर लक्ष ठेवणे हा त्यांच्या कामाचा महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषय असल्याने या कारवाईकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंढे यांनी नागरिकांनाही केवळ प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा न ठेवता आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गैरप्रकारांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. चुकीच्या पद्धतीच्या अन्नपदार्थांचे सेवन टाळण्याबरोबरच अतिप्रमाणात फॅट, साखर किंवा मीठ असलेल्या पदार्थांबाबतही नागरिकांनी सावध राहावे, असे त्यांनी सांगितले. प्रीती झिंटाच्या टी-शर्टची चर्चा काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रीती झिंटा ‘टीम तुकाराम मुंढे’ असा मजकूर असलेला काळा टी-शर्ट परिधान करून सार्वजनिक ठिकाणी दिसली होती. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला. यावेळी प्रीतीने अशा ‘हिरोंना’ सेलिब्रेट करण्याची हीच वेळ असल्याचे म्हटले होते. प्रीती झिंटाच्या या समर्थनाबाबत तुकाराम मुंढेंना विचारण्यात आले असता त्यांनी तिचे आभार मानले. “माझे प्रीती झिंटा यांच्याशी वैयक्तिकरीत्या किंवा फोनवर कोणतेही बोलणे झालेले नाही. मात्र, त्यांनी ‘टीम तुकाराम मुंढे’चा उल्लेख केला याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ‘फक्त टी-शर्ट घालून चालणार नाही’ दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी या समर्थनाचा व्यापक अर्थही स्पष्ट केला. सोशल मीडियावर पोस्ट करणे किंवा एखाद्या व्यक्तीच्या कामाचे कौतुक करणे यापेक्षा नागरिकांनी प्रत्यक्ष कृतीतून अन्न सुरक्षेच्या मोहिमेला हातभार लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, अन्न भेसळीविरोधातील लढा केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही. नागरिक, खाद्यपदार्थ विक्रेते आणि समाजातील विविध घटकांनी आपापली जबाबदारी पार पाडल्यास या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप मिळू शकते. तुकाराम मुंढे यांच्या या भूमिकेमुळे ‘नजर लागेल की नाही’ यापेक्षा अन्नाच्या गुणवत्तेवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याचा संदेश त्यांनी दिल्याचे दिसून येते. सध्या त्यांच्या अन्न सुरक्षा मोहिमेला बॉलिवूडमधील काही कलाकारांकडूनही सार्वजनिक समर्थन मिळत आहे. हेही वाचा…. गोकुळच्या निवडणुकीत महायुतीची मोर्चेबांधणी:चंद्रकांत पाटलांनी सांगितला प्लॅन, 8 ऑक्टोबरला चित्र स्पष्ट होणार कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीला आता चांगलाच वेग आला आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील आघाडीविरोधात महायुती एकत्रितपणे मैदानात उतरण्याची तयारी करत आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. सविस्तर वाचा…
Source link
‘नजर लागण्यावर माझा विश्वास नाही’:तुकाराम मुंढेंचा स्पष्ट संदेश, ‘टीम तुकाराम मुंढे’ टी-शर्टबद्दल प्रीती झिंटाचे मानले आभार