![]()
अमरावती जिल्ह्यातील शालार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या ५ हजारांहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ५ ऑक्टोबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत ई-केवायसी न केल्यास ऑक्टोबर महिन्याचे वेतन थांबवले जाईल, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे. शासनाच्या निर्णयानुसार हे आदेश काढण्यात आले आहेत. यापूर्वी ई-केवायसीसाठी २० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, जिल्ह्यातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही. एसआयआरच्या कामांमुळे अनेक शिक्षक व्यस्त होते. त्यामुळे त्यांना वेळेत ई-केवायसी करता आली नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. ही बाब शिक्षण विभागाच्या लक्षात आणून दिल्यावर, राज्याचे शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी आणि डॉ. महेश पालकर (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी ५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले. यानुसार स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांनीही आदेश काढले आहेत. अनेक शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामांमुळे ई-केवायसीसाठी वेळ कसा काढायचा, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. हा आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू आहे. तसेच, खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांनाही या आदेशाचे पालन करावे लागेल. ई-केवायसी आणि वेतनाचा संबंध लक्षात घेऊन, सर्व शाळांना तातडीने सूचना देण्याचे निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण निरीक्षक आणि वेतन पथकाचे अधीक्षक यांनाही दिले आहेत. ई-केवायसी प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना महाआयटीच्या शालार्थ टीमलाही देण्यात आल्या आहेत. त्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये आवश्यक व्हॅलिडेशन लागू करण्याचे निर्देशही दिले आहेत. अमरावतीचे शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे यांनी सांगितले की, “ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ५ ऑक्टोबर ही अंतिम मुदत आहे. यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी मुदतीपूर्वीच प्रक्रिया पूर्ण करावी.” प्राथमिक शिक्षक समितीचे पीआरओ राजेश सावरकर म्हणाले, “एसआयआरच्या कामांमुळे अनेक शिक्षक अजूनही व्यस्त आहेत. अनमॅप केलेल्या मतदारांची पडताळणी करण्यासाठी शिक्षकांना बीएलओ म्हणून काम करावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे.”
Source link
5 ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी करा, अन्यथा वेतन थांबेल:अमरावतीतील 5 हजारांवर शिक्षकांमध्ये खळबळ, शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश