Headlines

आयटकचे राज्य अधिवेशन 3 ऑक्टोबरपासून नागपूरमध्ये:कामगार कायद्यांवर मंथन होणार, 'संविधान बचाव-कामगार बचाव' रॅलीही निघणार




ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (आयटक) राज्य अधिवेशन येत्या 3आणि 4 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनात बदललेल्या कामगार कायद्यांवर चर्चा केली जाईल. त्यात आवश्यक ते बदल करण्यासाठी मोठ्या संघर्षाची योजना आखली जाणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘संविधान बचाव-कामगार बचाव’ रॅली काढली जाईल. ही रॅली 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता बालभवन, नागपूर येथून निघेल. पुढे ही रॅली संविधान चौक येथे पोहोचेल, जिथे जाहीर सभा आयोजित केली आहे. सभेला आयटकच्या राष्ट्रीय महासचिव कॉ. अमरजीत कौर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार कॉ. पी. संतोष कुमार, रामटेकचे खासदार कॉ. श्याम बर्गे, कॉ. मोहन शर्मा, कॉ. सुकुमार दामले, कॉ. बबली रावत आणि कॉ. सी. जोसेफ मार्गदर्शन करणार आहेत. अधिवेशनात सुमारे 500 प्रतिनिधी उपस्थित राहतील, असे आयोजकांनी सांगितले. ‘आयटक’शी संलग्न राज्यातील सर्व कामगार, कर्मचारी आणि संघटनांच्या सहभागाने आयोजित या अधिवेशनात केंद्र व राज्य सरकारच्या कामगार धोरणांचा आढावा घेतला जाईल. कामगार कायद्यातील बदल, खासगीकरण, भांडवलदारधार्जिणी धोरणे आणि कामगारांच्या हक्कांवरील वाढते हल्ले यावर सविस्तर चर्चा होईल. याशिवाय, आशा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी, उमेद कर्मचारी यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, ईएसआय, पीएफ, ग्रॅज्युइटी व पेन्शन लागू करणे, बांधकाम कामगार आणि घरकामगारांसह असंघटित कामगारांना मोठी सामाजिक सुरक्षा देणे, यासह विविध मागण्यांवर अधिवेशनात चर्चा होणार आहे. कामगार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या विरोधातील धोरणांना विरोध करण्यासाठी तसेच आगामी काळात विविध प्रश्नांवर मोठ्या संघर्षाचा कार्यक्रम निश्चित केला जाईल. या अधिवेशनाच्या निमित्ताने एका विशेष स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती आयटकचे प्रदेश सचिव कॉ. श्याम काळे यांनी दिली. या अधिवेशनाच्या पोस्टरचे प्रकाशन दिल्ली येथे आयटकच्या राष्ट्रीय महासचिव कॉ. अमरजीत कौर आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार कॉ. पी. संतोष कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयटकच्या राष्ट्रीय सचिव कॉ. बबली रावत, आयटक महाराष्ट्राचे राज्य सरचिटणीस कॉ. श्याम काळे आणि राज्य सचिव कॉ. राजू देसले, ॲड. सुभाष लांडे, प्रा. डॉ. राम बाहेती आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *