Headlines

महिला नको त्या भाषेत बोलत होत्या:मोर्चावर पाण्याची बॉटलही फेकून मारली, संतप्त महिलेवर मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया




मुंबईच्या वरळी येथे महायुतीच्या आक्रोश मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत एका सामान्य महिलेने भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळाले. यावरून विरोधकांनी सरकारवर विशेषतः भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता काल घडलेल्या प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्या महिलेची भाषा योग्य नव्हती, त्या वाट्टेल ते बोलत असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. गिरीश महाजन म्हणाले, सगळ्याच महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. याचे कारण म्हणजे आपल्याला कल्पना आहे कॉंग्रेसने या विधेयकाला विरोध केला होता. त्याच्या विरोधात मतदान केले होते. त्यामुळे महिलांमध्ये मोठा आक्रोश होता. अशाच एका मोर्चाचे आयोजन वरळी येथे झाले होते. मोर्चा सुरू असताना ट्रॅफिकची कोंडी झाली होती, हे खरे आहे. पण काल मोर्चा निघाला असताना आमच्या एक भगिनी महिला त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी खूपच संताप व्यक्त केला. त्या फारच चिडलेल्या होत्या आणि वाट्टेल तसे ते बोलत होत्या. त्यांनी तसे बोलायला नको होते. त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवायला पाहिजे होती. पाण्याची बॉटलही फेकून मारली पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, मी तिथेच होतो, तुमच्याशी संवाद साधत होतो. त्या महिला तिथेही आल्या, तुम्ही असे कसे करू शकता? रस्ते कसकाय बंद करू शकता? मी सांगू शकत नाही अशा भाषेत त्या बोलत होत्या आणि पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी पोलिसांशी देखील अरेरावी केली. महिला पोलिसही तिथे होत्या. त्यानंतर मी त्या महिलेला सांगितले की आम्ही एक 10-15 मिनिटांनी रस्ता क्लियर करतोय आणि आम्ही पुढे निघून जाऊ. पण त्यांनी काही ऐकून घेतले नाही. परत त्यांनी महिलांच्या मोर्चावर पाण्याची बॉटलही फेकून मारली. त्या ठिकाणी त्यांचा खूपच संताप चाललेला होता. मी पण सांगितले की ठीक आहे त्यांना बोलू द्या आणि थोड्या वेळाने त्या तिथून निघून गेल्या. पुढच्यावेळी आम्ही अधिक काळजी घेऊ गिरीश महाजन म्हणाले, आम्ही जो काही मोर्चा काढला होता तो महिलांसाठीच होता. महिलांच्या आरक्षणासाठीच होता. बिलाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता. त्यांचा राग-संताप हा खूपच अनावर झालेला होता. पण यापुढे आम्ही निश्चित अशी काळजी घेऊ, मोर्चा असला, आंदोलन असले की असे प्रकार घडतात याची आपल्याला कल्पना आहे. पुन्हा मी सांगेल की पुढच्यावेळी आम्ही अधिक काळजी घेऊ, पण त्या जे काही बोलल्या आहेत ते फार चांगल्या भाषेत नव्हते. मान्य आहे त्यांचा राग होता, पण तो वेगळ्या पद्धतीने त्या मांडू शकल्या असत्या. तक्रारही करू शकल्या असत्या पोलिसांकडे. पोलिसांनीच आम्हाला मोर्चाची परवानगी दिली होती. आम्ही परवानगी घेतली होती आणि आमचा रूटही दिलेला होता, अशी माहिती महाजन यांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *