Headlines

साताऱ्यातून ‘सुपरकार रूट’च्या भव्य रॅलीचा शुभारंभ:मुंबईच्या 25 सुपरकार्सचा सहभाग; उदयनराजे भोसले यांनी केले स्वागत, साताऱ्याच्या पर्यटनवाढीसाठी उपक्रमांचे स्वागत




मुंबईतील ‘द सुपर कार रूट ग्रुप’च्या तब्बल 25 सुपरकार्सचा ताफा साताऱ्यात दाखल होताच शहरातील कारप्रेमी आणि नागरिकांचे लक्ष वेधले गेले. जलमंदिर पॅलेस येथून या विशेष सुपरकार रॅलीचा शुभारंभ खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सातारा आणि कासच्या पर्यटनाला व्यापक व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी स्वागत केले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, “सातारा हा निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनस्थळांनी समृद्ध जिल्हा आहे. देशभरातील पर्यटकांपर्यंत साताऱ्याची ही ओळख अधिक प्रभावीपणे पोहोचणे गरजेचे आहे. अशा उपक्रमांमुळे साताऱ्याच्या पर्यटनाला नवी दिशा आणि व्यापक प्रसिद्धी मिळते. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळू शकते.” मुंबईहून आलेल्या या सुपरकार्समध्ये विविध नामांकित कंपन्यांच्या आकर्षक आणि अत्याधुनिक वाहनांचा समावेश होता. वाहनांच्या रचना, आधुनिक तंत्रज्ञान, इंजिनची क्षमता तसेच वाहनमालकांचे अनुभव याबाबत उपस्थितांना माहिती घेण्याची संधी मिळाली. सुपरकार्स पाहण्यासाठी नागरिकांचीही उत्सुकता दिसून आली. ‘द सुपर कार रूट ग्रुप’च्या या उपक्रमामागे केवळ कारप्रेम नसून विविध पर्यटनस्थळांची ओळख करून देण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सातारा, कास आणि परिसरातील निसर्गरम्य स्थळे, ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनक्षमता देशातील विविध भागांत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
साताऱ्यातून सुरू झालेल्या या सुपरकार रॅलीमुळे जिल्ह्याच्या पर्यटनाची वेगळी ओळख निर्माण करण्यास हातभार लागणार असून, भविष्यात अशा पर्यटनपूरक उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *