Headlines

विसर्जनानंतर जुहू चौपाटीवर 'सी शोअर शाइन 2026':अजय देवगण, अमृता फडणवीस आणि पालिका आयुक्तांकडून स्वच्छता मोहीम




गणेशोत्सवाच्या सांगतेनंतर आणि अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकांनंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर साचलेला कचरा व निर्माल्याची विल्हेवाट लावण्यासाठी व्यापक स्वच्छता अभियान राबवण्यात आले. प्रसिद्ध जुहू चौपाटीवर ‘दिव्यज फाऊंडेशन’, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सी शोअर शाइन २०२६’ या विशेष बीच क्लीन-अप मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, सामाजिक कार्यकर्त्या व दिव्यज फाऊंडेशनच्या संस्थापिका अमृता फडणवीस, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, दिविजा फडणवीस यांच्यासह अनेक सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष चौपाटीवर उतरून श्रमदान केले. शहर आणि समुद्र स्वच्छ ठेवणे आपलीच जबाबदारी; अभिनेता अजय देवगणचे आवाहन स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना अभिनेता अजय देवगण म्हणाला, “ज्याप्रमाणे आपण सर्वजण आपल्या घराची काळजी घेतो आणि घर स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या देशावर, आपल्या शहरावर आणि आपल्या समुद्रावरही तितकेच प्रेम करतो. त्यामुळे समुद्र आणि शहर स्वच्छ ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी नाही का? जोपर्यंत प्रत्येक नागरिक शहर स्वच्छ ठेवण्याचा ठाम निश्चय करत नाही, तोपर्यंत कोणताही बदल घडणार नाही.” “प्रत्येक व्यक्तीने कचरा न टाकण्याचा आणि स्वच्छता राखण्याचा छोटासा प्रयत्न केला, तर आपण आपले शहर सहज सुंदर ठेवू शकतो. एवढेच नाही, तर अस्वच्छता पसरवणाऱ्यांनाही ‘हे माझेही शहर आहे, त्यामुळे कृपया घाण करू नका’ असे ठामपणे सांगण्याची सवय आपण अंगीकारली पाहिजे. आपला आणि आपल्या पर्यावरणाचा भविष्यकाळ तुमच्या सर्वांच्या हातात आहे.” उत्सव साजरे करताना पर्यावरणपूरक जीवनशैलीची सवय हवी- अमृता फडणवीस गेल्या सहा वर्षांपासून अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी विसर्जनस्थळी स्वच्छता मोहीम राबवणाऱ्या दिव्याज फाऊंडेशनच्या संस्थापिका अमृता फडणवीस यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यावर भर दिला. “गणपती विसर्जनानंतर मोठ्या प्रमाणावर निर्माल्य आणि कचरा किनाऱ्यावर येतो. लहान मुले, तरुण आणि विविध संस्था जेव्हा अशा मोहिमांमध्ये एकत्र येतात, तेव्हा समाजात जबाबदार नागरिकत्वाची भावना निर्माण होते.” “आपण आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचा आदर नक्कीच केला पाहिजे; परंतु त्याच वेळी उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याची जीवनशैली आपल्याला आत्मसात करावी लागेल. ही स्वच्छता मोहीम केवळ एका दिवसाचा उपक्रम न राहता ती प्रत्येकाची रोजची सवय बनली पाहिजे.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कन्या दिविजा फडणवीस यांनीही या मोहिमेत सहभाग घेत, “आपल्या शहराचे आणि सागराचे रक्षण करणे ही केवळ सरकारची नसून आपल्या प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी आहे. तरुणांनी स्वतः पुढाकार घेतला तर मोठे सकारात्मक बदल घडू शकतात,” असा विश्वास व्यक्त केला. मुंबईची ओळख समुद्राशी जोडलेली; त्याचे रक्षण सामूहिक कर्तव्य- पालिका आयुक्त अश्विनी भिडे मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी मोहिमेत सहभागी होत नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. “मुंबईची खरी ओळख येथील विस्तीर्ण समुद्रकिनारे आणि सागराशी घट्ट जोडलेली आहे. समुद्राचे संरक्षण करणे आणि किनारपट्टी स्वच्छ राखणे हे प्रत्येक मुंबईकराचे सामूहिक कर्तव्य आहे.” “नैसर्गिक साधनसंपत्तीचे मोल ओळखून भावी पिढीसाठी ही संपत्ती टिकवणे गरजेचे आहे. तरुणांमध्ये समुद्राविषयी आणि पर्यावरणाविषयी संवेदनशीलता वाढावी, यासाठीच पालिकेने दिव्याज फाऊंडेशनच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेतला आहे.” कृत्रिम तलावांमुळे समुद्रावरील भार कमी- अमित साटम भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी गणेश विसर्जनाच्या व्यवस्थेबाबत बोलताना मुंबई महापालिकेच्या कृत्रिम विसर्जन तलावांच्या उपक्रमाचा उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, यंदा मुंबईत सुमारे 80% ते 90% गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये झाले, तर तुलनेने कमी संख्येने मोठ्या मूर्तींचे समुद्रात विसर्जन करण्यात आले. समुद्रात होणाऱ्या विसर्जनाचे प्रमाण कमी झाल्यास समुद्राच्या पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था ही पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते, असे साटम यांनी म्हटले. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात निर्माण होणारा कचरा कमी करण्यासाठी केवळ विसर्जनाची व्यवस्था पुरेशी नसून निर्माल्य व्यवस्थापन, सजावटीचे साहित्य, प्लास्टिकचा वापर आणि नागरिकांचे वर्तन या सर्व बाबींवरही सातत्याने काम करण्याची गरज आहे. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिनिधी आणि कलाकारांनी एकत्र येऊन केलेल्या या श्रमदानामुळे दुपारपर्यंत जुहू चौपाटी पूर्ववत स्वच्छ आणि सुंदर करण्यात प्रशासनाला मोठे यश आले. विद्यार्थी, NGOs आणि विविध क्षेत्रांतील लोकांचा सहभाग या स्वच्छता अभियानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात केवळ राजकीय किंवा प्रशासकीय व्यक्तींचा सहभाग नव्हता. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, आध्यात्मिक संघटना, कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींनीही समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता केली. यामुळे पर्यावरण संवर्धन हा केवळ सरकारी यंत्रणांचा विषय नसून समाजातील प्रत्येक घटकाचा विषय आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. गणपती विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यावर दिसणारा कचरा साफ करण्यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणावर यंत्रणा तैनात करते. मात्र, कचरा निर्माण होण्याचे प्रमाणच कमी झाले तर त्याचा दीर्घकालीन फायदा अधिक होऊ शकतो. त्यामुळे अशा मोहिमांसोबतच नागरिकांच्या सवयींमध्ये बदल घडवण्यावर भर देणे आवश्यक ठरते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *