![]()
शेतकऱ्यांचे पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीचे दर कोसळल्याने क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सेनगाव ते गोरेगाव मार्गावर बुधवारी ता. 22 दुपारी हळद पेटवून देत शासनाचा निषेध केला. आगामी काळात मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर हळद फेकून आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. राज्यात सर्वात जास्त हळद हिंगोली जिल्ह्यात पिकविली जाते. हिंगोलीच्या हळदीने देशभरात ओळख निर्माण केली असून बाहेर राज्यातही हिंगोलीच्या हळदीची मागणी होत आहे. सध्या नवीन हळदीची आवक होत आहे. मात्र हळदीची आवक वाढल्यानंतर हिंगोलीच्या संत नामदेव हळद बाजारात हळदीच्या दरात घसरण झाली. सुमारे एक ते दीड महिन्यापूर्वी 16 हजार रुपये क्विंटल प्रमाणे खरेदी केली जात असलेली हळद आता 12 हजार रुपये क्विंटल दराने खरेदी केली जात आहे. हळदीचे भाव कोसळल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आंदोलन केले होते. दरम्यान, क्रांतीकारी शेतकरी संघटनेने हळदीच्या दराच्या प्रश्नावरून आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज गोरेगाव ते सेनगाव मार्गावर पदाधिकाऱ्यांनी हळद पेटवून देत शासनाचा निषेध केला. यावेळी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, सतीष इडोळे, तालुकाध्यक्ष प्रविण मते, शांतीराम पाटील, मनोहर सावके पाटील, संतोष सावके, सखाराम भाकरे, ज्ञानेश्वर कारवखे, संजय इंगळे, गोपाल पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच बटावच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या पैशातून रक्कम कपात करणाऱ्या व्यापाऱ्यांचाही निषेध केला आहे. हळदीच्या प्रश्नावर आगामी काळात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर हळद फेकून आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे. यावेळी हिंगोली बाजार समितीचे माजी सचिव नारायण पाटील, विशाल गुंडेवार, बुळे यांनी पदाधिकाऱ्यांचे निवेदन स्विकारले. यावेळी अनुचीत प्रकार घडू नये यासाठी गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद झळके, उपनिरीक्षक नितेश लेनगुळे, जमादार अनिल भारती यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
Source link
..तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर हळद फेकून आंदोलन करणार:हळदीच्या दरावरून क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक, हळदीची केली होळी