Headlines

पाणीटंचाईमुळे साडेतीनशे तरुणांचे विवाह रखडले:शेवटी हताश ग्रामस्थांनी ‘तुळशी गाव विकणे आहे, किंमत- फक्त पाणी’, असे फलक लावत केला प्रशासनाचा निषेध




महाराष्ट्रातील माढा तालुक्यातील तुळशी गाव सध्या एका विदारक समस्येशी झुंजत आहे. पाण्याचा भीषण दुष्काळ केवळ शेतीवरच नाही, तर इथल्या तरुणांच्या संसारावरही उठला आहे. गावात पाण्याचा थेंब नसल्याने, कुणीही बाप आपली मुलगी इथल्या तरुणांना द्यायला तयार नाही. परिणामी, गावातील तब्बल साडेतीनशे तरुणांचे विवाह रखडले आहेत. प्रशासनाचे उंबरठे झिजवून आणि सर्व मार्गांनी आंदोलने करूनही पाणी मिळत नसल्याने, आता हताश ग्रामस्थांनी चक्क ‘तुळशी गाव विकणे आहे, किंमत- फक्त पाणी’ असा धक्कादायक फलक लावून सरकारचे लक्ष वेधले आहे. तुळशी गावाची लोकसंख्या सात हजारांच्या घरात आहे. अपूर्ण असलेल्या सीना-माढा उपसा सिंचन प्रकल्पामुळे या गावाला अनेक वर्षांपासून केवळ टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. येथील बहुतांश ग्रामस्थ शेती आणि पशुपालनावर उदरनिर्वाह करतात. मात्र, पाण्याच्या दुर्भिक्षामुळे त्यांच्या उपजीविकेचाच प्रश्न गंभीर बनला आहे. तुळशीचे सरपंच शरद मोरे यांनी संताप व्यक्त करत, “आम्ही हा अन्याय आणखी किती काळ सहन करायचा?” असा उद्विग्न सवाल प्रशासनाला विचारला आहे. आंदोलनांचा काहीच परिणाम नाही सीना-माढा योजनेचे पाणी कायमस्वरूपी मिळावे, यासाठी गावकऱ्यांनी आतापर्यंत लोकशाही मार्गाने अनेक आंदोलने केली. माढा तहसील कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन, मोर्चे, आमरण उपोषण आणि तरुणांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून केलेले शोलेस्टाइल आंदोलनही प्रशासनाला जागे करू शकले नाही. अखेर सर्व मार्ग बंद झाल्याने ग्रामस्थांनी संतापाच्या भरात गावच विक्रीला काढल्याचे जाहीर केले आहे. हाताला रोजगार नाही, गावात साडेतीनशे तरुण अविवाहित पाण्याच्या भीषण टंचाईचा सर्वात मोठा आणि हृदयस्पर्शी फटका गावातील तरुण पिढीला बसला आहे. गावात शेतीला पाणी नाही, परिणामी हाताला रोजगार नाही. याच कारणामुळे बाहेरगावचे लोक आपल्या मुली तुळशी गावात द्यायला धजावत नाहीत. आजघडीला गावातील सुमारे ३५० हून अधिक तरुण लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत या घरात सनईचे सूर घुमणे कठीण झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *