![]()
यंदाच्या अल्प पावसामुळे अमरावतीसह राज्याच्या विविध भागात गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्नाचे कोणतेही साधन उरलेले नाही. या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आज, सोमवार, २८ सप्टेंबर रोजी एसडीओ अनिल भटकर यांच्या कार्यालयासमोर ‘हल्लाबोल आंदोलन’ करण्यात आले. मागण्यांचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले. केवळ दुष्काळाची घोषणा न करता प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. संघटनेच्या मते दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी. नियमित कर्जदार शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे. सन २०२४ व २०२५ मधील प्रलंबित पीक विम्याची रक्कम तात्काळ खात्यात जमा करावी. २०२६ चा पीक विमा नियमानुसार मंजूर करावा. कर्जाच्या थकबाकीमुळे शेतकऱ्यांचे सिबील खराब होणार नाही, यासाठी आदेश काढावेत. पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. सन २०१९ पूर्वीचे प्रलंबित पीक कर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी. शेतमजूर व भूमिहीन कुटुंबांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे. दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी चारा-पाण्याची तातडीने व्यवस्था करावी. नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचीही त्वरित व्यवस्था करावी. नुकसानीचे पंचनामे करून प्रत्यक्ष आधारावर मदत वितरित करावी. शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट लक्षात घेता वीजबिल व कर्जवसुलीच्या कारवायांना तात्पुरती स्थगिती द्यावी. या मागण्याही यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील भुयार, शहराध्यक्ष नंदकिशोर शेरे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष कुंदन काळे, संजय आपकाजे, उपाध्यक्ष प्रशांत शिरभाते, पिंटूभाऊ गुडधे, अनिल पवार, शक्ती वानखडे, शुभम पाटील, मंदार शिरभाते, हेमंत भुयार आदी सहभागी झाले होते.
Source link
दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात:क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे हल्लाबोल आंदोलन