![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, आरएसएसचे नियोजनबध्द प्रयत्न, देशभरात केलेला हिंदुत्ववादाचा अवलंब यामुळे येत्या ३० वर्षात भाजपा सत्तेतून हटणार नाही परंतु, भाजपाने काँग्रेसप्रमाणेच भ्रष्ट राजवट अंगिकारली तर देशभरात भाजपाची काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही, असे परखड मत जेष्ठ राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केले. येथील वीरशैव विदया संवर्धिनी मंडळाच्या व्याख्यानमालेत पत्रकार प्रभाकर सूर्यवंशी यांनी घेतलेल्या प्रगट मुलाखतीमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीचे अराजक या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, अतुल सोनिग्रा, दिनानाथ काटकर, डॉ. रामचंद्र जगताप आदी उपस्थित होते. या वेळी देशभरातील राजकारणावर भाष्य करताना भाऊ तोरसेकर म्हणाले, काँग्रेसच्या अल्पसंख्याकाच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे आणि भाजपामध्ये १५ वर्षापेक्षा अधिक काळ संघटनात्मक पातळीवर काम केलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे भाजपाची सत्ता आली. भाजपाने प्रादेशिक पक्षांना कधी स्विकारत तर कधी त्यांचा बीमोड करत राजकारण केले. आज भाजपा देशभरामध्ये रूजलेली आहे. महाराष्ट्रामध्ये २०२२ पासून घडलेल्या राजकीय समीकरणांबाबत भाकित केले होते आणि कालांतराने ते खरे ठरले. उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेबांची विचारसरणी सोडली. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख म्हणून राज्यातच नव्हे तर देशात सुध्दा आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला. अगदी मायकल जॅक्सनसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायक व नर्तकाने सुध्दा ठाकरेंबद्दल काढलेले गौरवोद्गार मी ऐकले आहेत. यावेळी प्रास्ताविकात मंडळाचे उपाध्यक्ष रावसाहेब मनगिरे म्हणाले, ज्ञान, माहिती, मनोरंजन, प्रबोधन यासाठी ही व्याख्यानमाला असल्याचे सांगितले. यावेळी मंडळाच्यावतीने गुणवंत विदयार्थ्यांना विदयावृत्ती देवून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीरेंद्र ताकपिरे यांनी केले. आभार अशोक मठपती यांनी मानले. भाऊ तोरसेकर यांची मुलाखत घेताना पत्रकार प्रभाकर सूर्यवंशी. देवेंद्र फडणवीस हे दुसरे शरद पवारच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला मर्यादा आहेत. त्यामुळे काँग्रेस देशात वाढणार नाही तर कॉक्रोच जनता पार्टी ही झुरळ ज्याप्रमाणे झूम करून पाहिल्यानंतर मोठे दिसते त्याप्रमाणे आज जरी मोठे दिसत असली तरी तिचे आयुष्य हे सहा महिन्यांपेक्षा अधिक नाही. काँग्रेस देशभरात रूजलेला मोठा पक्ष असल्यामुळे तो भविष्यामध्ये पुन्हा डोके वर काढू शकतो. मात्र काँग्रेसमधील नेत्यांनी नेतृत्वबदलाचा विचार केला पाहिजे. राष्ट्रीय नेते शरद पवार हे विश्वासार्हता निर्माण करू शकले नाहीत त्यामुळे त्यांना राजकारणात मोठया संकटांना सामोरे जावे लागले व ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये मागे पडले. देवेंद्र फडणवीस हे दुसरे शरद पवारच आहेत, असेही मत देखील भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केले.
Source link
जेष्ठ राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांचे बार्शीमध्ये परखड मत:भाजपने भ्रष्ट राजवट अंगिकारल्यास त्यांचा काँग्रेस व्हायला जास्त वेळ लागणार नाही