Headlines

युवा शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहावे- आमदार लहामटे:अकोले बाजार समितीची वार्षिक सभा उत्साहात, मका खरेदी केंद्र सुरू करणार‎




कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायापालट करण्यासाठी सरकारकडून २ ते अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे माझे प्रयत्न आहेत. यातून समितीचे संपूर्ण आवार चकाचक करण्यात येईल. सरकारकडून दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचे लाभ मिळतील असे होण्याआधीच मुबलक पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखी होऊ दे, असे भावनिक उद्गार आमदार डॉ. किरण लहामटे यांनी काढले. शेतकरी जगला तरच देश जगेल. शेती ही आता केवळ परंपरा नाही तर सर्वात मोठा व्यवसाय आहे. तरुण शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे न लागता शेती आणि शेतीपूरक संस्था स्थापन करून शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहावे, असे आवाहन आमदार डॉ. लहामटे यांनी केले. अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. लहामटे मार्गदर्शन करताना बोलत होते. बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर संचालक अशोक देशमुख, परबत नाईकवाडी, पाटील सावंत, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष नीता आवारी, रोहिदास भोर, संदीप शेटे आदी उपस्थित होते. आ. लहामटे म्हणाले, अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीने तोट्यातून बाहेर येत २२ लाखांचा नफा मिळवला हा सर्व संचालकांच्या एकजुटीचे लक्षण आहे. गेल्या वर्षी आपण शासनाचे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. याच धर्तीवर मका खरेदी केंद्र सुरू करू. त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांपुढे हात पसरावे लागणार नाहीत. यापुढील काळात मार्केट कमिटी हीच शेतकऱ्यांची हमी असेल. अकोले व समशेरपूर येथील भाजीपाला खरेदी केंद्र यशस्वी झाले. राजूर व कोतुळ फाटा येथेही असेच केंद्र सुरू करू. यासाठी तरुण व्यावसायिकांनी पुढे यावे. जागा आणि सहकार्य बाजार समिती देईल. एक चांगला बाजार उभा राहिला तर शेकडो हातांना काम मिळेल, असेही लहामटे यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *