![]()
लक्ष्मी रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौकात असलेल्या बँक ऑफ इंडिया या बँकेच्या इमारतीतील सहाव्या मजल्यावर मंगळवारी आग लागली. त्यामध्ये महत्त्वाची कागदपत्रे, संगणक, लॅपटॉप, झेरॉक्स यंत्रणेला आगीची झळ पोहोचली. मात्र, रोकड सुरक्षित आहे. आगीत कोणीही जखमी झाले नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी सव्वा तासाच्या प्रयत्नांतर आगीवर नियंत्रण मिळवले. गजबजलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील उंबऱ्या गणपती चौकात (शगुन चौक) बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. बँकेची सहा मजली इमारत आहे. तळमजल्यावर बँकेच्या शाखेचे कामकाज चालते. सहाव्या मजल्यावर बँकेचे कार्यालय आहे. तेथे बॅटरी ठेवण्याची खोली आहे. मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास सहाव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली. आगीचे स्वरूप मोठे असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने सात बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आगीत कोणी अडकले नसल्याची खातरजमा करण्यात आली. अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी गजानन सोनुने, केंद्रप्रमुख पंकज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ३५ ते ४० जवानांनी आग आटोक्यात आणली. या इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयात आग लागली. तळमजल्यावर बँकेची शाखा आहे. बँकेचे कामकाज तळमजल्यावर चालते. अग्निशामक दलाच्या जवानांनी बँकेतील रकमेबाबत चौकशी केली, तेव्हा रोकड सुरक्षित असल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली, असे अग्निशामक दलातील अधिकाऱ्यांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत मंगळवारी सकाळी बँकेच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयातील वातानुकूलन यंत्रणा बँकेतील एका कर्मचाऱ्याने सुरू केल्यानंतर आग लागली. कर्मचाऱ्याने अग्निरोधक उपकरणाचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग भडकल्यानंतर बँकेने याबाबतची माहिती अग्निशामक दलाच्या मुख्य केंद्राला कळविली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे.
Source link
पुण्यातील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीला आग, कागदपत्रे जळाली:सहाव्या मजल्यावर लागलेल्या आगीत रोकड सुरक्षित, कोणीही जखमी नाही