![]()
संगीत ही तरल, मौखिक विद्या आहे. त्याचे पुरावे, संदर्भ मिळविणे अतिशय क्लिष्ट असते. अशा कलेला शब्दांमध्ये अंकित करण्याचे आव्हान मी स्वीकारले. लोकांना शास्त्रीय संगीत आपलेसे वाटावे, त्याला मंदिरात न बसविता किंवा रस्त्यावर न आणता स्वत:चा दर्जा, मान मिळावा या हेतूने हिंदुस्थानी संगीताचा इतिहास अभ्यासला. ‘हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास’ या संथोधनात्मक ग्रंथांच्या माध्यमातून स्वरांकित कलेला अक्षरांकित केले. पुरस्कारामुळे संगीत कलेला साहित्य दरबारात मान मिळाला आहे, असे भावोद्गार लेखिका, अभ्यासक आणि शास्त्रीय गायिका अंजली मालकर यांनी काढले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे संशोधनात्मक ग्रंथासाठी देण्यात येणाऱ्या कृष्ण मुकुंद स्मृती पुरस्काराने ‘हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास’ (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध) या ग्रंथांच्या लेखिका अंजली मालकर यांना मंगळवारी (दि. २९) सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. विजय कोपरकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना मालकर बोलत होत्या. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कार्यवाह सुनेत्रा मंकणी, देणगीदार मोहन गुजराथी मंचावर होते. सन्मानचिन्ह, ग्रंथ आणि दहा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. अंजली मालकर पुढे म्हणाल्या, कुठलाही इतिहास परिपूर्ण नसतो, त्याचा शोध घेताना अनेक अनुषंगिक पुरावे, चित्र, हस्तलिखिते यांचे संदर्भ शोधून अनुमान काढावे लागते. माझ्या सुदैवाने मला हे पुरावे, संदर्भ सापडत गेले आणि या पुस्तकाची निर्मिती झाली. पं. विजय कोपरकर म्हणाले, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात अंजली मालकर यांनी मोलाचे कार्य केले असून ‘हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास’ हे ग्रंथ संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना संदर्भग्रंथ म्हणून नक्कीच उपयोगी ठरतील. पुरस्कारामागील भावना विशद करताना मोहन गुजराथी म्हणाले, आम्हा सर्व कुटुंबियांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वास्तूशी ऋणानुबंध जुळला आहे. माझे सासरे कृष्ण मुकुंद उजळंबकर यांच्या कार्याचे विशेष स्मरण रहावे या करिता त्यांच्या नावे संशोधनात्मक ग्रंथनिर्मितीसाठी हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. डॉ. स्वाती महाळंक प्रास्ताविकात म्हणाल्या, भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा प्राचिन आहे. भारतीयांच्या जीवनात पदोपदी संगीत भरले आहे. या क्षेत्रात अंजली मालकर यांनी संशोधनात्मक कार्य करून मोलाची भर घातली आहे.
Source link
अंजली मालकर यांना 'हिंदुस्थानी संगीताच्या इतिहासा'साठी पुरस्कार:महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिला सन्मान; म्हणाल्या, 'हा तर संगीत कलेचा साहित्य दरबारात सन्मान'