Headlines

पुणे गांधी भवनमध्ये महात्मा गांधी सप्ताह सुरू:1 ते 7 ऑक्टोबरदरम्यान वैचारिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल; मान्यवर सहभागी




राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा नव्या पिढीला परिचय व्हावा आणि त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे, यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या संयुक्त विद्यमाने गांधी भवन, कोथरूड येथे १ ते ७ ऑक्टोबरदरम्यान महात्मा गांधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवंगत अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे यंदाचे १५वे वर्ष आहे. सप्ताहात पर्यावरण, सामाजिक चळवळी, लोकशाहीसमोरील आव्हाने, गांधी विचार, चित्रपट आणि काव्य अशा विविध विषयांवर व्याख्याने, परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ज्येष्ठ लेखक व पत्रकार अंबरिश मिश्र, तुषार गांधी, विवेक सावंत, सुषमा अंधारे, माधव भंडारी, विकास लवांडे, प्रशांत जगताप, पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांच्यासह विविध मान्यवर सहभागी होणार आहेत. सप्ताहाचे उद्घाटन १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता अंबरिश मिश्र यांच्या हस्ते होईल. सर्वधर्म प्रार्थनेनंतर ‘एक थेंब गांधी’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती व जागतिक अहिंसा दिनानिमित्त सकाळी ८.३० वाजता प्रार्थना व भजन होईल. त्यानंतर सकाळी ९ वाजता डेक्कन येथील मक्केशाह मस्जिद व पांचाळेश्वर मंदिरापासून गांधी भवनपर्यंत शांतता मार्च काढण्यात येणार आहे. ३ ऑक्टोबरला अभिजित दिपके यांचे ‘आमचे आंदोलनातील अनुभव’ आणि विवेक सावंत यांचे ‘तरुणांपुढील आव्हाने’ या विषयांवर मार्गदर्शन होईल. ४ ऑक्टोबरला जादूचे प्रयोग तसेच ‘लोकशाहीसमोरील आव्हाने’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. ५ ऑक्टोबरला ‘द ग्रेट इंडियन इल्युजन डॉक्युमेंटरी’वर संवाद, ६ ऑक्टोबरला अतुल देऊळगावकर यांचे ‘पोरके पर्यावरण’ या विषयावर व्याख्यान, तर ७ ऑक्टोबरला वैचारिक कवितांचा कार्यक्रम होईल. दररोज दुपारी ३ वाजता विविध देशांतील गाजलेल्या नेत्यांवरील चरित्रपटांसह प्रबोधनात्मक व माहितीपर चित्रपट दाखविले जाणार आहेत. सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत खादी, पुस्तके, हातमाग व गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल्सही उपलब्ध असतील. सप्ताहाची माहिती महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *