Headlines

ऐतिहासिक खंडोबा मंदिरात 'किरणोत्सव' अवतरला:हेरिटेज वॉकमधून उघडकीस आला दोन शतकांपूर्वीचा खगोलीय आविष्कार




छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक वारसा दिनानिमित्त आयोजित ‘हेरिटेज वॉक’मधून सातारा परिसरातील ऐतिहासिक खंडोबा मंदिरात एक अनोखा ‘किरणोत्सव’ उघडकीस आला आहे. दोन ते अडीच शतकांपूर्वीच्या भारतीय शिल्पकारांच्या खगोलशास्त्रीय कौशल्याचा हा एक अद्भुत पुरावा आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वतः हा विलोभनीय सोहळा कॅमेऱ्यात कैद केला. ‘इंटॅक’ आणि ‘सहपीडिया’ यांच्या वतीने आयोजित या हेरिटेज वॉकमध्ये पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर सहभागी झाले होते. मंदिराला भेट दिल्यानंतर पुजाऱ्यांनी येथील किरणोत्सवाचा उल्लेख केला. या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी औंधकर आणि पवार यांनी अधिक चौकशी केली असता, हा किरणोत्सव बुधवारपासून सुरू होत असल्याचे समोर आले. ठरल्याप्रमाणे, आज सकाळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर मंदिरात उपस्थित होते. सूर्य वर येताच, त्याची किरणे गर्भगृहाच्या झरोक्यातून मंदिरात प्रवेशली. हा प्रकाशझोत खंडेरायाच्या देव्हाऱ्याच्या कळसाकडून हळूहळू खाली सरकत चरणांपर्यंत पोहोचला, ज्यामुळे संपूर्ण गर्भगृह सोनेरी प्रकाशाने उजळून निघाले. सुमारे दोन ते अडीच शतकांपूर्वी कोणत्याही आधुनिक उपकरणांशिवाय भारतीय शिल्पकारांनी खगोलशास्त्राचा अचूक अभ्यास करून हे मंदिर उभारले होते. सूर्याच्या उत्तरायण-दक्षिणायन स्थितीचा विचार करून झरोक्यांची केलेली रचना आजही तितकीच अचूक ठरत आहे. श्री. पवार आणि श्री. औंधकर यांच्या प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. हा ‘किरणोत्सव’ उद्या आणि परवा, म्हणजेच २३ व २४ एप्रिल रोजी सकाळी ८:३० ते ९ या वेळेत भाविकांना पाहता येणार आहे. नागरिकांनी या अद्भुत खगोलीय अविष्काराचे साक्षीदार होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *