![]()
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर धाराशिव येथील आश्रमशाळा संस्थाचालक अरुण निटूरे यांनी अत्यंत गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. एका इमारतीच्या गच्चीवरून स्वतः रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये निटूरे यांनी मंत्री शिरसाट, त्यांचे स्वीय सहाय्यक (PA) आणि समाजकल्याण विभागाच्या कारभारावर संतप्त सवाल उपस्थित केले आहेत. “गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळांचे अनुदान वर्षानुवर्षे अडवून ठेवायचे आणि मंत्र्यांच्या बंगल्यांवर पीएंच्या माध्यमातून 35 ते 40 लाखांची उघड लाच मागायची,” असा थेट आरोप करत निटूरे यांनी या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. आश्रमशाळांचे हक्काचे पैसे द्या, गरिबांचा तळतळाट घेऊ नका! व्हायरल व्हिडिओमध्ये संस्थाचालक अरुण निटूरे यांनी थेट मंत्री संजय शिरसाट यांना उद्देशून संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. “आम्ही हलाखीच्या परिस्थितीत गोरगरीब, मागासवर्गीय मुलांची काळजी घेत आश्रमशाळा चालवतो. मात्र, गेल्या 27 वर्षांपासून या आश्रमशाळांचे शासकीय पैसे आणि अनुदान अडवून ठेवण्यात आले आहे. गोरगरिबांचा तळतळाट घेऊ नका, शाळांचे पैसे देऊन टाका.” शिक्षकांचे हाल आणि आत्महत्येची वेळ “हजारो शिक्षक विनावेतन काम करत असून कित्येक जण 20-20 वर्षे सेवा करून विनापगारी निवृत्त झाले आहेत. शासन निर्णय न घेता फायली दाबून बसल्यामुळे आज संस्थाचालक आणि शिक्षकांवर विष पिऊन आत्महत्या करण्याची वेळ आली आहे,” असा उद्विग्न सवाल त्यांनी केला. 75 कोटींचे बंगले अन् 5 कोटींच्या गाड्या आल्या कुठून? मंत्री संजय शिरसाट यांच्या वाढत्या संपत्तीवर थेट बोट ठेवत निटूरे म्हणाले, “जिल्हा परिषद सदस्य असलेला सामान्य कार्यकर्ता आज इतका मोठा कसा झाला? पाच-पाच कोटी रुपयांच्या गाड्या (डिफेंडर, मर्सिडीज), 75 कोटी रुपयांचे आलिशान बंगले आणि हजारो कोटींची माया आली कुठून? हे पैसे शेतात घाम गाळून कमावले आहेत का?” दलित वस्ती सुधारणा निधीत कमिशनचा आरोप “मंत्र्यांच्या बंगल्यांमध्ये केवळ टक्केवारीचे व्यवहार चालतात. दलित वस्तीच्या कामांमध्ये 15 ते 20 टक्के कमिशन लाटले जात असून कंत्राटदार आत्महत्या करत आहेत, तर दुसरीकडे मंत्र्यांच्या ताफ्यात नव्या गाड्या दाखल होत आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. मंत्र्यांचे पीए आणि सचिवांवर थेट टक्केवारीचा आरोप निटुरे यांनी केवळ मंत्र्यांवरच नव्हे, तर त्यांच्या प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांची नावे घेऊन पैसे मागितल्याचा दावा केला आहे. “मंत्र्यांनी पीए पैसे गोळा करण्यासाठी ठेवले आहेत का? त्यांचे स्वीय सहाय्यक भंडारे हे एका वस्तीगृहाच्या 24 मुलांच्या मान्यतेसाठी 35 ते 40 लाख रुपयांची उघड मागणी करतात. या संदर्भातील सर्व पुरावे मी देण्यास तयार आहे.” सचिवांच्या कारभारावरही आक्षेप समाजकल्याण विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून संविधानानुसार काम न करता फायली अडवून ठेवल्या जात असल्याचा आरोप केला. “ज्यांनी पैसे दिले, त्यांच्याच फायली निघतात; फुकट कोणाचेही काम होत नाही आणि भाषणात मात्र ‘कोणालाही पैसे देऊ नका’ असा केवळ आव आणला जातो,” असा टोला त्यांनी लगावला. फडणवीस साहेब, शिरसाट यांच्या संपत्तीची चौकशी करा! व्हिडिओच्या शेवटी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना समाजकल्याण खात्यात काय चालले आहे हे कसे दिसत नाही? सरकार सामान्य गरिबांची चौकशी करते, पण अशा मंत्र्यांकडे इतकी अमाप संपत्ती कुठून आली याची चौकशी का करत नाही? फडणवीस साहेबांनी तत्काळ या प्रकरणाची आणि शिरसाट यांच्या संपत्तीची निष्पक्ष चौकशी करावी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळांचे हक्काचे अनुदान तातडीने मंजूर करावे,” अशी मागणी अरुण निटूरे यांनी केली आहे. दरम्यान, एका आश्रमशाळा संस्थाचालकाने थेट समाजकल्याण मंत्र्यांवरच भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणारा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. ————————————————- हेही वाचा… ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा: नाना पटोले म्हणाले – लोकशाही वाचवण्यासाठी आम्हीही रस्त्यावर उतरणार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात देशभरातील विरोधी पक्षांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठे आंदोलन पुकारण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी या मोर्चासाठी इतर विरोधी पक्षांनाही सोबत येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने या आंदोलनात सहभागी होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
75 कोटींचे बंगले अन् 5-5 कोटींच्या गाड्या आल्या कुठून?:धाराशिवच्या आश्रमशाळा चालकाचा मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप; शाळांचे पैसे अडवले, पीए 35 लाख मागतो!