Headlines

पुणे रेल्वेचे वाहतूक निरीक्षक किरण होजगे सेवानिवृत्त:34 वर्षांच्या सेवेत पुणे स्थानकाचा विकास, सुरक्षितता वाढवण्यात दिले योगदान




मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील वाहतूक निरीक्षक (नियोजन) किरण मारुती होजगे हे ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. पुणे रेल्वे स्थानकावरील वाढता वाहतूक ताण कमी करण्याबरोबरच रेल्वेची सुरक्षितता, प्रवासी व मालवाहतूक क्षमता वाढविणे आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या नियोजनात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. पुणे रेल्वे स्थानकावरील वाढता ताण कमी करण्यासाठी अतिरिक्त सहा फलाटांच्या निर्मितीचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी पुणे रेल्वे यार्डच्या पुनर्रचनेचे आराखडे व आवश्यक कार्यान्वयन आराखडा तयार करून अंतिम करण्यात त्यांच्या अनुभवाचा उपयोग झाला. हडपसर व खडकी येथे अतिरिक्त उपनगरी रेल्वे गाड्यांसाठीची स्थानके विकसित करण्याच्या नियोजनातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुणे-लोणावळा रेल्वेमार्गावर स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे नियोजन, तसेच मार्गाची वेगमर्यादा व वाहतूक क्षमता वाढविण्यासाठी १२ ठिकाणी मध्यवर्ती सिग्नल केंद्रांची तरतूद करण्यात आली. पुणे-लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वेमार्गासाठी संकल्पनात्मक आराखडे तयार करून ते रेल्वे विकास महामंडळामार्फत रेल्वे मंडळाकडे सादर करण्यात आले. पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामातही त्यांनी नियोजन व अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर महत्त्वपूर्ण योगदान दिले. विविध स्थानकांसाठी आवश्यक आराखडे तयार करण्याबरोबरच मोठ्या स्वरूपाच्या कामांचे नियोजन करताना प्रवाशांची सुरक्षितता आणि रेल्वे गाड्यांची वेळेवर धाव यांचा समतोल राखण्यावर त्यांनी भर दिला. मालवाहतुकीची क्षमता वाढविण्यासाठी गुरमार्केट, सांगली, कराड व सातारा येथील मालधक्क्यांच्या क्षमतावाढीचे नियोजन करण्यात आले. फुरसुंगी येथे नवीन मालधक्का सुरू करण्याच्या नियोजनातही त्यांचा सहभाग होता. कोल्हापूर स्थानकावर अतिरिक्त फलाट आणि विद्यमान फलाटांची लांबी वाढवून २४ डब्यांच्या गाड्या हाताळण्याची सुविधा निर्माण करण्यात आली. शिवाजीनगर येथे उपलब्ध रेल्वे जमिनीचा वापर करून अतिरिक्त उपनगरी रेल्वे स्थानक उभारण्याचे नियोजनही त्यांच्या कार्यकाळात झाले. उरुळी येथील अल्ट्राटेक सिमेंट, पाटस येथील पेन्ना सिमेंट व श्री सिमेंट,तसेच भारत पेट्रोलियम आणि आळंदी येथील खासगी मालवाहतूक जोडमार्गांच्या नियोजनातही त्यांनी योगदान दिले.आणखी चार खासगी जोडमार्गांची कामे सध्या सुरू आहेत.होजगे यांच्या कार्याची रेल्वे प्रशासनाने वेळोवेळी दखल घेतली. त्यांना दोन विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पाच प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक आणि एक महाव्यवस्थापक पुरस्कार मिळाले. तसेच तीन वेळा रेल्वे मंडळाच्या पुरस्कारासाठी त्यांचे नामांकन झाले. निरोप समारंभास वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अनिलकुमार पाठक, डॉ. मिलिंद भोई, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त मिलिंद गायकवाड व शिरीष मोहिते उपस्थित होते. निवृत्त रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सुनीत शर्मा, निवृत्त महाव्यवस्थापक मिलिंद देऊस्कर आणि पश्चिम मध्य रेल्वेच्या प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांनी संदेशाद्वारे होजगे यांच्या कार्याचा गौरव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *