![]()
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात आज मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देशभरातून आलेल्या ‘जेन झी’ तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सीजेपीने या आंदोलनाचा इशारा आधीच दिला होता, मात्र पोलिसांनी या आंदोलनाला अधिकृत परवानगी नाकारली होती. तरीही हे आंदोलन पार पडल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. परवानगी नसतानाही आंदोलन केल्यामुळे अभिजीत दिपके आणि त्यांच्या टीमच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी मुंबईच्या शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात अभिजीत दिपके, सौरभ दास, आशुतोष रांका आणि रत्ना सिंह यांच्या विरोधात एका व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. विनापरवानगी गर्दी जमवणे आणि बॉम्बे हायकोर्टाने जनहित याचिका (PIL) 116/2009 नुसार 4 जानेवारी 2013 रोजी दिलेल्या निकालाचे, तसेच राज्य सरकारच्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे. कायद्याचे उल्लंघन या आंदोलनाला शांततापूर्ण मार्गाने झालेले आंदोलन म्हणता येणार नाही, कारण आंदोलनाच्या नावाखाली थेट सरकारी आदेशांचे उल्लंघन करण्यात आले आहे. ज्या लोकांनी या आंदोलनादरम्यान संविधानाच्या रक्षणाचा मोठा दावा केला, त्याच लोकांनी प्रत्यक्षात कायद्याचे आणि नियमांचे उल्लंघन केले आहे, असा गंभीर आरोप दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. सीजेपीच्या प्रमुख मागण्या कोणत्या? मुंबईत विनापरवानगी पार पडलेल्या या आंदोलनामागे सीजेपीच्या प्रामुख्याने तीन मागण्या होत्या. यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, एसआयआर (SIR) प्रक्रिया संपूर्णपणे रद्द करण्यात यावी आणि 2029 च्या निवडणुका या 2025 च्या मतदार यादीनुसारच घेण्यात याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी आजचे हे आंदोलन पुकारण्यात आले होते. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. मुंबईत कॉकरोच जनता पार्टीचे जेल भरो आंदोलन:प्रत्येकाच्या टी-शर्टवर गांधीजींचे चित्र; कॉकरोच पार्टीने म्हटले – मुंबई फक्त ट्रेलर आहे, फायनल दिल्लीत होईल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आज मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. मंचावरील प्रत्येकाने गांधीजींचे चित्र असलेले टी-शर्ट घातले होते. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके म्हणाले, “जेव्हा भारताचे पंतप्रधान अमेरिकेला भेट देतात, तेव्हा अनेकदा म्हटले जाते की ते गांधीजींच्या देशातून आले आहेत. गांधीजी देशाचा आत्मा आहेत, आंबेडकर कणा आहेत आणि नेहरू मेंदू आहेत.” वाचा सविस्तर
Source link
शिवाजी पार्कमध्ये सीजेपीचे विनापरवानगी आंदोलन:अभिजीत दिपकेंसह चौघांवर पोलिसांत तक्रार; सरकारी आदेशांचे उल्लंघन केल्याचा आरोप