Headlines

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत युगेंद्र पवारांचा घणाघात:‘भाजप मागच्या दराने बारामतीत येण्याचा प्रयत्न करतोय’, सुनेत्रा पवार-जगतापांवरही निशाणा




बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत तिरंगी लढत होत असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षानेही ‘श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल’ मैदानात उतरवले आहे. या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ युवा नेते युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी युगेंद्र पवार यांनी विरोधकांवर टीका करत कारखान्याच्या कारभारापासून भाजपच्या बारामतीतील राजकीय प्रवेशापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. युगेंद्र पवार यांनी कार्यकर्ते आणि सभासदांना प्रचारादरम्यान संयम ठेवण्याचे आवाहन केले. आगामी काळात विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप आणि चिखलफेक केली जाऊ शकते. मात्र, त्याला उत्तर देण्यात वेळ न घालवता आपला प्रचार आणि सभासदांचे हित यावर लक्ष केंद्रित करा, असे त्यांनी सांगितले. ‘दुसऱ्याला शिव्या देऊन कोणी मोठं होत नाही’ “आता विरोधकांकडून खूप चिखलफेक केली जाईल. पण आपण त्यात पडायचे नाही. त्यांना जे करायचे ते करू द्या. आपण आपला प्रचार करत राहायचा. दुसऱ्याला शिव्या दिल्याने कोणी मोठे होत नाही. सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करा,” असे युगेंद्र पवार यांनी सांगितले. कारखान्याचे सभासद आणि शेतकरी हे राजकारण समजून घेणारे आहेत. कारखान्यात काय सुरू आहे आणि कोण कोणत्या भूमिकेत आहे, याची त्यांना पूर्ण जाणीव आहे, असेही त्यांनी म्हटले. ‘किटलीशिवाय कपबशी भरत नाही’; सुनेत्रा पवारांना टोला निवडणुकीतील चिन्हांचा उल्लेख करताना युगेंद्र पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नाव न घेता टोला लगावला. “किटली हे आपले चिन्ह आहे. किटलीशिवाय कपबशी भरत नाही,” असे ते म्हणाले. यानंतर त्यांनी दुसऱ्या चिन्हाचा उल्लेख करत कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. “दुसरे चिन्ह शिट्टी आहे. शिट्टी आपण सावध करण्यासाठी वाजवतो. त्यामुळे सभासदांना सावध करा, भाजप इथे आलेला आहे,” असा टोला त्यांनी लगावला. ‘लोक म्हणतात, पवार साहेबांशिवाय पर्याय नाही’ युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करत आपल्या प्रचारादरम्यान मिळालेल्या प्रतिसादाबाबतही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत 80 हून अधिक गावांमध्ये दौरे केले आहेत. या दौऱ्यांमध्ये अनेक लोकांनी “आता पवार साहेबांशिवाय पर्याय नाही,” अशी भावना व्यक्त केल्याचा दावा त्यांनी केला. अजित पवार कारखान्याच्या कारभारात असताना शरद पवार यांनी या संस्थेकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. हा कारखाना सभासदांचा असून तो त्यांच्या हितासाठीच चालला पाहिजे, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले. ‘आमचे उमेदवार सामान्य, पण सक्षम’ आपल्या पॅनलमधील उमेदवारांबाबत बोलताना युगेंद्र पवार यांनी विरोधकांच्या आर्थिक ताकदीवरही अप्रत्यक्ष टीका केली. “आमचे उमेदवार सामान्य आहेत. त्यांच्याकडे मोठ्या गाड्या नाहीत. गाडीचा नंबर 5555 दिसणार नाही. पण याचा अर्थ ते कमी आहेत असा नाही. आमच्या पॅनलमध्ये उच्चशिक्षित आणि सक्षम उमेदवार आहेत,” असे ते म्हणाले. कारखाना चालवण्यासाठी मोठ्या गाड्या किंवा आर्थिक ताकद नव्हे, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आणि काम करण्याची इच्छा महत्त्वाची आहे, असा संदेश त्यांनी दिला. तीन महिलांना उमेदवारी; गावांना संधी देण्याचा दावा युगेंद्र पवार यांनी आपल्या पॅनलने महिलांना अधिक प्रतिनिधित्व दिल्याचा दावा केला. “आमच्या पॅनलमध्ये तीन महिलांना उमेदवारी दिली आहे. दुसऱ्या पॅनलमध्ये दोन महिला आहेत. महिलांना संधी देणे ही शरद पवार साहेबांची भूमिका आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच गरडवाडी गावाला पहिल्यांदाच संचालकपदासाठी संधी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. काही ठिकाणी अनेक वर्षे तेच उमेदवार कायम राहतात; मात्र आपल्या पॅनलने नव्या गावांना आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली असल्याचे युगेंद्र पवार यांनी म्हटले. ‘कामगारांची भरती वशिल्यावर नाही, मेरिटवर झाली पाहिजे’ कारखान्याच्या प्रशासनावर भाष्य करताना युगेंद्र पवार यांनी पारदर्शक कारभाराची गरज व्यक्त केली. कारखान्यातील कामगारांची भरती गुणवत्तेच्या आधारावर झाली पाहिजे, कोणाच्या ओळखीने किंवा वशिल्याने नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. कारखान्यात साखरेसोबतच विविध उपपदार्थ तयार करता येऊ शकतात. त्यातून कारखान्याचे उत्पन्न वाढवून सभासदांना अधिकचा दर देता येईल, असेही त्यांनी सांगितले. कारखान्याचा कारभार पारदर्शक ठेवून सभासदांच्या हिताला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ‘सत्ता नसली तरी पवार साहेबांची कामे होतात’ “आता साहेबांची सत्ता नाही, त्यामुळे त्यांच्याकडून काही होणार नाही,” असे काहीजण म्हणत आहेत. मात्र, शरद पवार हे मोठे नेते असून सत्ता असो किंवा नसो, त्यांच्या माध्यमातून लोकांची कामे होत असतात, असा दावा युगेंद्र पवार यांनी केला. सहकार क्षेत्राचा शरद पवार यांना मोठा अनुभव आहे. त्या अनुभवाचा फायदा सोमेश्वर कारखान्याला घेऊन देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘भाजप मागच्या दराने बारामतीत येण्याचा प्रयत्न करत आहे’ बारामतीच्या राजकारणावर भाष्य करताना युगेंद्र पवार यांनी भाजपवरही निशाणा साधला. “बारामतीत भाजप मागच्या दराने येण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना आपले गुरू मानत असल्याचे बारामतीतील कार्यक्रमात म्हटले होते, याची आठवणही युगेंद्र पवार यांनी करून दिली. आगामी 3 नोव्हेंबरला पंतप्रधान बारामतीत येणार असल्याचा उल्लेख करत, बारामतीची विकासकामे आणि स्थानिक प्रश्न शरद पवार त्यांच्या निदर्शनास आणून देतील आणि त्यातून कामे मार्गी लागतील, असे ते म्हणाले. ‘कारखाना चांगला चालवून दाखवू’ शेवटी युगेंद्र पवार यांनी सभासदांना आपल्या पॅनलला साथ देण्याचे आवाहन केले. आपले पॅनल विजयी झाल्यास आठवड्यातून किमान एक दिवस कारखान्यासाठी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. “मी आठवड्यातील एक दिवस कारखान्याला देईन. इथे बसून कारभार समजून घेईन. गरज पडली तर शरद पवार साहेबांचे मार्गदर्शन घेईन. मात्र, हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून दाखवू,” असा विश्वास युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आता तीन पॅनल आमनेसामने असल्याने ही निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता बारामतीच्या राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. हेही वाचा… नारायणगडावर पुन्हा लाखोंचा मराठा मेळावा:मनोज जरांगेंचं मोठं आवाहन, सरकारसह निवडणूक आयोगावरही हल्लाबोल मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांसह निवडणूक आयोगाच्या कारभारावरही त्यांनी गंभीर आरोप केले. दरम्यान, आगामी दसरा मेळाव्याबाबतही जरांगे पाटील यांनी महत्त्वाची घोषणा केली असून, यंदाचा दसरा मेळावा नारायणगड येथे नियोजित पद्धतीने होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या मेळाव्यासाठी मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *