Headlines

मिरा-भाईंदरमध्ये स्वयं पुनर्विकासाला चालना:5 इमारतींचा प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्याचे दरेकरांचे आवाहन




विकासकांकडून प्रकल्प रखडण्याच्या समस्येवर स्वयं पुनर्विकास हा प्रभावी पर्याय ठरू शकतो. मिरा-भाईंदरच्या विकासाला स्वयं पुनर्विकासाची चळवळ दिशादर्शक ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. मिरा-भाईंदरमध्ये स्वयं पुनर्विकासाला चालना देण्यासाठी आमदार नरेंद्र मेहता यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात ते बोलत होते. आमदार दरेकर यांनी यावेळी मिरा-भाईंदरमध्ये सुरुवातीला 5 गृहनिर्माण संस्थांचा प्रायोगिक तत्त्वावर स्वयं पुनर्विकास करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. या 5 इमारतींचे प्रकल्प सुरू झाल्यानंतर इतर गृहनिर्माण संस्थांचाही स्वयं पुनर्विकासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, असे त्यांनी सांगितले. शिबिराला आयोजक आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, जिल्हाध्यक्ष दिलीप जैन, मिरा-भाईंदर महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक पुरुषोत्तम शिंदे, अप्पर तहसीलदार निलेश गौड, मुंबई बँकेचे ज्येष्ठ अधिकारी कृष्णा पोटे, स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे अधिकारी सुदेश रोझेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि विविध गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विकासकांकडून प्रकल्प रखडत असल्याने स्वयं पुनर्विकासाचा विचार आमदार दरेकर म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतःचे घर हे आयुष्यातील मोठे स्वप्न असते. आयुष्यभराची कमाई घरासाठी खर्च केली जाते. मात्र अनेकदा विकासकांकडून प्रकल्प वर्षानुवर्षे रखडतात. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांनी स्वतःच्या पुनर्विकासाची जबाबदारी घेण्याच्या दृष्टीने स्वयं पुनर्विकासाचा पर्याय पुढे आला. “विकासासाठी पैसा आणि परवानग्यांचा प्रश्न सोडवला तर गृहनिर्माण संस्था स्वतःचा विकास करू शकतात,” असे दरेकर यांनी सांगितले. मुंबई जिल्हा बँकेमार्फत गृहनिर्माण संस्थांना कर्ज उपलब्ध करून देण्याची पॉलिसी आणण्यात आली. स्वयं पुनर्विकासाच्या सुरुवातीच्या काळात परवानग्यांसाठी आपण स्वतः पाठपुरावा केल्याचेही त्यांनी सांगितले. या चळवळीला प्रतिसाद मिळू लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन स्वयं पुनर्विकासासाठी सवलती देण्याची मागणी करण्यात आली. गोरेगाव येथील नेस्को येथे गृहनिर्माण संस्थांची परिषद घेण्यात आली. या परिषदेत करण्यात आलेल्या 20 मागण्यांपैकी 18 मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या असून त्यासंदर्भात शासन निर्णयही झाल्याचे दरेकर यांनी सांगितले. मुंबईत 21 इमारतींचे स्वयं पुनर्विकासातून काम पूर्ण मुंबईत सध्या सुमारे 1,600 इमारती स्वयं पुनर्विकासासाठी पुढे आल्या असून त्यापैकी 46 इमारतींना कर्ज देण्यात आले आहे. त्यातील 21 इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून रहिवासी मोठ्या घरांमध्ये राहायला गेल्याचे दरेकर यांनी सांगितले. स्वयं पुनर्विकासाची व्याप्ती लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीने 3 महिने राज्याचा दौरा करून शासनाला अहवाल सादविला. हा अहवाल शासनाने स्वीकारल्याचेही दरेकर यांनी सांगितले. मुंबईनंतर पुण्यात 2, ठाण्यात 3 ते 4 आणि नवी मुंबईत 2 इमारतींचे स्वयं पुनर्विकासाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील इतर भागांतही ही चळवळ विस्तारत असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘इमारतीचा निर्णय सोसायटीच घेते’ स्वयं पुनर्विकासामध्ये गृहनिर्माण संस्थेतील सभासदच आपल्या इमारतीचे मालक असतात. आर्किटेक्ट कोण असावा, इमारतीचे डिझाईन कसे असावे, कंत्राटदार कोण असावा, यासह विविध निर्णय घेण्याचा अधिकार गृहनिर्माण संस्थेला असतो, असे दरेकर यांनी सांगितले. स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून इमारत 3 वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. मुंबईत पूर्ण झालेल्या 21 इमारतींपैकी सर्व इमारती अडीच ते 3 वर्षांच्या कालावधीत पूर्ण झाल्याचा दावाही त्यांनी केला. स्वयं पुनर्विकासासाठी विविध सवलती उपलब्ध असून 4 टक्के व्याजाचा परतावा देण्याचा विषय शासनाकडे प्रलंबित आहे. हा विषय मार्गी लावण्याची शिफारस आपण केली असल्याचेही दरेकर यांनी सांगितले. स्वयं पुनर्विकासासाठी निधी वाढवण्याची मागणी स्वयं पुनर्विकासाची चळवळ वेगाने वाढत असल्याने त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्य सहकारी बँकेला स्वयं पुनर्विकासासाठी 10 हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आल्याचे दरेकर यांनी सांगितले. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनीही एनसीडीसीमार्फत 1 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. मात्र वाढती मागणी पाहता आणखी 25 हजार कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले असून त्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करण्यास सांगण्यात आल्याचे दरेकर यांनी नमूद केले. ‘स्वयं पुनर्विकास म्हणजे आत्मनिर्भरता’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले आहे. त्याच धर्तीवर गृहनिर्माण संस्थांनीही स्वतःची इमारत स्वतः उभी करणे म्हणजे स्वयं पुनर्विकासातून आत्मनिर्भर होणे असल्याचे दरेकर म्हणाले. “हौसिंग सोसायट्यांनी आणि सभासदांनी आत्मनिर्भर व्हावे. स्वतःची इमारत स्वतः उभी करावी. यासाठी बँका आणि शासन मदतीसाठी पाठीशी आहेत. गरज आहे ती इच्छाशक्तीची,” असे दरेकर यांनी सांगितले. मिरा-भाईंदरमध्ये स्वयं पुनर्विकासासाठी स्थानिक पातळीवर काही अडचणी असल्यास त्याचे निवेदन तयार करून प्राधिकरणाकडे द्यावे. त्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. गरज पडल्यास मिरा-भाईंदरसाठी विशेष सवलती देण्याची मागणीही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. ‘5 इमारतींचा प्रकल्प सुरू करा’ मिरा-भाईंदरमध्ये स्वयं पुनर्विकासाची चळवळ प्रत्यक्षात आणण्यासाठी आमदार नरेंद्र मेहता यांनी सुरुवातीला 5 इमारतींचा प्रायोगिक तत्त्वावर स्वयं पुनर्विकास करण्याचा संकल्प करावा, असे दरेकर यांनी सुचवले. “आपण एक बैठक घेऊन त्याचा अॅक्शन प्लॅन करू. या 5 इमारतींचे काम सुरू झाल्यानंतर आणखी 500 लोक पुढे येतील. स्वयं पुनर्विकास शक्य आहे आणि त्याचा फायदा होऊ शकतो, यावर त्यांचा विश्वास बसेल,” असे दरेकर म्हणाले. वर्षानुवर्षे इमारतींचा पुनर्विकास रखडल्याने अनेक नागरिकांना भाडेही मिळत नाही आणि जुन्या इमारतींमध्ये राहावे लागते. अशा परिस्थितीत स्वयं पुनर्विकास हा पर्याय ठरू शकतो. त्यामुळे मिरा-भाईंदरमधील नागरिकांनी स्वयं पुनर्विकासाच्या चळवळीला साथ द्यावी, असे आवाहन दरेकर यांनी केले. ‘मिरा-भाईंदरवासियांसाठी सर्व करू’; मुख्यमंत्र्यांचा संदेश दरम्यान, शिबिराला मिळालेल्या प्रतिसादाचा फोटो आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविला असल्याचे दरेकर यांनी सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून एसएमएसद्वारे सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांचा संदेश महापौर डिंपल मेहता यांना दाखविल्याचे सांगताना दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी “ओके, पुढे जा… मिरा-भाईंदरवासियांसाठी आपण सर्व करू,” असा संदेश पाठविला आहे. त्यामुळे मिरा-भाईंदरमधील स्वयं पुनर्विकासाच्या प्रकल्पांना शासनस्तरावर आवश्यक सहकार्य मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे दरेकर यांनी स्पष्ट केले. हेही वाचा… अजित पवारांचे नाव न वापरता निवडणूक लढा’:सुनेत्रा पवारांचे आव्हान; ‘दादांना मनातून कसे काढणार?’ पुरुषोत्तम जगतापांचा सवाल बारामती तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बंडखोरीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, राष्ट्रवादीतून बंडाचे निशाण उभारलेले नेते पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या पाठिंब्याने ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ निवडणूक रिंगणात उतरवले आहे. या पार्श्वभूमीवर, अजितदादांचे नाव न वापरता स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवून दाखवा, असे थेट आव्हान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले होते, ज्यावर आता पुरुषोत्तम जगताप यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *