![]()
सातारा तालुक्यातील न्हाळेवाडीत दोन वर्षांच्या चिमुकल्या जय खंडागळेचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेल्यानंतर रविवारी संतापाचा उद्रेक झाला. घराच्या दारात खेळणाऱ्या चिमुकल्यालाही सुरक्षित ठेवता येत नसेल तर वनविभागाच्या उपाययोजना नेमक्या कुणासाठी? असा सवाल करीत मृत बालकाच्या नातेवाईकांसह परिसरातील तीन गावांतील ग्रामस्थांनी थेट खा उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसवर धाव घेतली. शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास जय संदीप खंडागळे ( २ वर्ष २ महिने ) हा घरासमोर खेळत होता. परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जयचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात पसरताच भीतीसोबतच वनविभागाच्या कार्यपद्धतीविरोधात संताप वाढत गेला. एकीकडे घरातील चिमुकल्याचा मृतदेह आणि दुसरीकडे गावाभोवती बिबट्याची दहशत, अशा स्थितीत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केवळ आर्थिक मदतीची मागणी न करता बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याचा आग्रह धरला. जलमंदिर पॅलेसवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने दाखल झाल्यानंतर वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस प्रशासनही तेथे पोहोचले. ‘आता आश्वासन नको, कृती दाखवा’ ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने मोहीम हाती घेण्याची मागणी केली. बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान, खा उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत वनविभागाने मृत बालकाच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची तातडीची मदत दिली. उर्वरित १५ लाख रुपयांची मदत महिनाभरात शासकीय नियमानुसार देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, या मदतीने कुटुंबाचा आक्रोश कमी झालेला नाही. “पैशाने आमचा जय परत येणार नाही. आमच्या मुलाचा जीव गेला; आता दुसऱ्या मुलाचा जीव जाऊ देऊ नका. बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करा,” अशी भावना जयचे वडील संदीप खंडागळे यांनी व्यक्त केली. बैठक होणार; पण निर्णय काय? न्हाळेवाडी परिसरातील वाढता धोका लक्षात घेऊन उद्या सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. बिबट्याचा बंदोबस्त, नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक नियोजन यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. मात्र, बैठका आणि आश्वासनांपलीकडे प्रत्यक्ष कृती कधी होणार? हा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे. जयचा जीव गेल्यानंतर प्रशासनाने हालचाल सुरू केली असली, तरी आता या हालचालींचे रूपांतर ठोस कारवाईत झाले नाही, तर न्हाळेवाडीतील संताप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Source link
'जय गेला.. आता तरी बिबट्याला पकडा':न्हाळेवाडीतील चिमुकल्याच्या मृत्यूने संतापाचा उद्रेक; तीन गावांचे ग्रामस्थ जलमंदिरवर धडकले