Headlines

शक्तिपीठाला लाख कोटी, शेतकऱ्याला काय?:दुष्काळात निवडणुकांची घाई कशाला? आधी शेतकरी वाचवा, निवडणुका नंतर घ्या – सुप्रिया सुळे




राज्यातील अनेक भागांत दुष्काळाची तीव्रता वाढत असताना सरकारने निवडणुकांपेक्षा शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल एक लाख कोटी रुपये उभे करण्याची तयारी सरकार दाखवत आहे; मग दुष्काळग्रस्त शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामीण जनतेसाठी निधी उपलब्ध का करून दिला जात नाही, असा सवाल करत सुळे यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील उपस्थित होते. राज्यात दुष्काळाचे संकट असताना जिल्हा बँका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याची घाई कशासाठी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आधी मायबाप जनतेला मदत करा, निवडणुका नंतर घ्या “राज्यातील शेतकरी पाणी आणि अन्नाच्या प्रश्नाने त्रस्त आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसमोर अनेक समस्या आहेत. अशा परिस्थितीत निवडणुका घेण्याची घाई करण्यापेक्षा सरकारने आधी दुष्काळग्रस्तांना मदत करावी. मायबाप जनतेला मदत करा आणि निवडणुका नंतर घ्या,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही काळ पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली. सध्या राजकीय संघर्ष करण्याची नव्हे, तर संकटात सापडलेल्या जनतेच्या मदतीसाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शक्तिपीठ महामार्गापेक्षा विद्यार्थ्यांचे शिक्षण महत्त्वाचे शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित खर्चाचा मुद्दा उपस्थित करत सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “शक्तिपीठ महामार्ग दोन वर्षे उशिरा झाला तर फार मोठे नुकसान होणार नाही. मात्र, पैशाअभावी एखाद्या मुलाचे शिक्षण थांबले, तर त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते,” असे त्या म्हणाल्या. सरकारने मोठ्या पायाभूत प्रकल्पांसोबतच दुष्काळग्रस्त शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या अडचणींकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, विद्यार्थ्यांची फी माफी आणि सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी केली. रोजगार हमी योजनेतील बदलांवरही टीका रोजगार हमी योजना अधिक प्रभावी आणि बळकट करण्याची गरज असताना त्यामध्ये बदल केले जात असल्याची टीका सुळे यांनी केली. ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजना महत्त्वाची आहे. त्यामुळे अशा योजनांमध्ये बदल करण्यापेक्षा त्यांना अधिक निधी आणि बळ देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीचा (डीपीसी) निधी फ्रीज करण्याच्या निर्णयावरही त्यांनी आक्षेप घेतला. जिल्ह्यांच्या विकासासाठी उपलब्ध असलेला निधी रोखल्यामुळे स्थानिक पातळीवरील विकासकामांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. मतदारसंख्या कमी होण्याची पारदर्शक चौकशी करा मतदार यादीतील मतदारसंख्या कमी होण्याच्या प्रकारावरही सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित केला. मतदारसंख्येत झालेल्या बदलांची पारदर्शक पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. निवडणूक प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी मतदार यादीबाबत निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे स्पष्ट उत्तर मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या पुण्यात सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचाही सुप्रिया सुळे यांनी उल्लेख केला. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी सरकारने त्यांच्याशी संवाद साधावा. विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेऊन चर्चेतून मार्ग काढावा आणि दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. “जिल्हा परिषदांना दमदाटी करण्याची ताकद, पण जनतेला मदतीसाठी वेळ नाही” सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना सुप्रिया सुळे यांनी, “जिल्हा परिषदांना दमदाटी करण्याची ताकद सरकारकडे आहे; पण त्याच जिल्ह्यातील जनतेला मदत करण्यासाठी वेळ नाही,” असा घणाघात केला. सरकारने आधी जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यावे आणि संकटग्रस्त शेतकरी, विद्यार्थी व ग्रामीण जनतेला आवश्यक ती मदत करावी, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा दोन दिवसांत केली जाईल, अशी माहितीही सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली. हेही वाचा…. मालेगावमध्ये धरणाच्या पाण्यात बाप-लेकांसह तिघांचा बुडून मृत्यू:मेंढ्यांना पाणी पाजताना काळाचा घाला मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मालेगाव तालुक्यातील कजवाडे येथे घडली. दोन सख्खे भाऊ आणि त्यांच्या वडिलांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने कजवाडे गावावर शोककळा पसरली आहे. पावसाअभावी परिसरातील नदी, नाले आणि ओढे कोरडे पडल्याने मेंढ्यांना पाणी मिळावे यासाठी हे कुटुंब धरणाकडे गेले होते. मात्र, याच ठिकाणी दुर्दैवी दुर्घटना घडली. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *