महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारातील सुधारणांसह अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज चौथा दिवस असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही विद
.
पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राजकारण करण्यासाठी आपण येथे आलेलो नाही, तर विद्यार्थ्यांचा मित्र म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असल्याने आंदोलनाबाबत संवेदनशीलपणे विचार करण्याची गरज असल्याचंही राणे म्हणाले.
‘मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक’
MPSCच्या कारभाराबाबत आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. आयोगातील सुधारणांसाठी प्रक्रिया सुरू असून सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत आहे, असा दावा नितेश राणे यांनी केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारकडून आवश्यक पावले उचलली जात असून प्रशासनातील बदल आणि सुधारणा करण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
MPSCमधील सुधारणांसाठी व्ही. राधा समिती काम करत असल्याचा उल्लेखही राणे यांनी केला. या समितीच्या माध्यमातून आयोगाच्या कामकाजात आवश्यक सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना आपल्या हक्कांसाठी पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
रोहित पवारांना चर्चेचं आवाहन
आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार उपस्थित असून ते विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यावर बोलताना नितेश राणे यांनी रोहित पवारांचं कौतुकही केलं. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी रोहित पवार लढत आहेत, ही चांगली बाब आहे. मात्र या प्रश्नावर आंदोलनाबरोबरच चर्चेची भूमिकाही आवश्यक आहे, असं राणे म्हणाले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे रोहित पवारांनीही चर्चेचा मार्ग स्वीकारावा, असं आवाहन राणे यांनी केलं. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे; मात्र त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होऊ नये, याचीही काळजी घेतली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
‘रोहित पवार उद्या माझ्यासोबत मंत्रिमंडळात असतील’
यावेळी नितेश राणे यांनी रोहित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचीही चर्चा झाली. रोहित पवार हे आपले मित्र असल्याचं सांगत राणे म्हणाले की, ते चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणतात. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण दोघांनीही एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.
विशेष म्हणजे, ‘रोहित पवार कदाचित उद्या माझ्यासोबत मंत्रिमंडळात मंत्री असतील’, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी आपण राजकीय वक्तव्य किंवा टीका करण्यासाठी आलेलो नसल्याचंही राणे यांनी स्पष्ट केलं.
‘विद्यार्थ्यांना वेठीस धरू नका’
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून आंदोलनाबाबत निर्णय घ्यावा, असं आवाहन नितेश राणे यांनी केलं. रोहित पवारांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सरकारवर दबाव आणावा; मात्र विद्यार्थ्यांना आंदोलनात वेठीस धरलं जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘हा राजकारणाचा मंच नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीच आम्ही मंत्रालयात बसतो,’ असं सांगत राणे यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना सरकारवर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं.
‘सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी’
सरकारने विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्यांवर सकारात्मक पावले उचलली असून प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांबाबतही निर्णय घेतले आहेत, असा दावा राणे यांनी केला. सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून त्यांना अपेक्षित असलेली प्रक्रिया राबवण्याबाबत सरकार तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. MPSCच्या कामकाजात पारदर्शकता आणि आवश्यक सुधारणा करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबाचा आणि भविष्यातील करिअरचा विचार करावा, असंही राणे म्हणाले.
दरम्यान, MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांवर विद्यार्थी ठाम आहेत. त्यामुळे सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतरही आंदोलन मागे घेतलं जाणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा….
साताऱ्यात कौटुंबिक वादाचा भीषण शेवट!:वडिलांच्या बॅटच्या प्रहारात 17 वर्षीय मुलीचा मृत्यू; पुरावे पुसण्याचाही प्रयत्न

घरातील किरकोळ वादाचे रूपांतर टोकाच्या संघर्षात होऊन एका 17 वर्षीय मुलीला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना सातारा शहरातील गोडोली परिसरात घडली. शनिवारी रात्री टीव्ही बंद करण्यावरून सुरू झालेला वाद मोबाईलच्या वापरावरून वाढला. त्यानंतर झालेल्या झटापटीत वडिलांनी मुलीच्या डोक्यात लाकडी बॅटने प्रहार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. गंभीर दुखापत झाल्यानंतर मुलीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे घटनेनंतर घरातील रक्ताचे डाग तसेच घटनास्थळावरील अन्य पुरावे पुसण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. सविस्तर वाचा…