Headlines

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभिजित दिपकेंची भेट:शिक्षण, मतदान आणि उद्योगांवरून सरकारवर निशाणा




धर्म आणि जात धोक्यात असल्याच्या भावनिक मुद्द्यांवर मतदान करण्याऐवजी शिक्षण, रोजगार, रस्ते आणि पेपरफुटीसारख्या प्रश्नांवर मतदारांनी विचार करायला हवा, असे म्हणत कॉकऱोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकार आणि मतदारांच्या राजकीय भूमिकेवर टीका केली. पुण्यात विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला दिपके यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील उद्योग, शिक्षण व्यवस्था, मतदानाचा अधिकार आणि सरकारच्या कारभारावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. दिपके म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर समाजाने अधिक गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. शिक्षणाच्या पुस्तकांमध्ये विज्ञान आणि गणिताला मोठे स्थान दिले जाते; मात्र नागरिक म्हणून आपले अधिकार आणि कर्तव्ये समजून देणाऱ्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकाकडे तुलनेने कमी लक्ष दिले जाते. त्यामुळे नागरिकांनी मतदानाचा अधिकार नेमका कशासाठी वापरायचा, याबाबत अजूनही पुरेशी जाणीव निर्माण झालेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ‘धर्म-जात धोक्यात’च्या नावावर मतदान कशासाठी? राजकारणात अनेकदा धर्म किंवा जात धोक्यात असल्याचे सांगून मतदारांकडून मतदान करून घेतले जाते. मात्र अशा मुद्द्यांमुळे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यात नेमका काय बदल होतो, याचा विचार मतदारांनी करायला हवा, असे दिपके यांनी सांगितले. मतदान करताना चांगले शिक्षण मिळणार आहे का, विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का, घरासमोरील रस्ते सुधारले जाणार आहेत का, स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी थांबणार आहे का, रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत का, याचा विचार मतदारांनी करायला हवा. केवळ भावनिक आणि धार्मिक मुद्द्यांच्या आधारावर मतदान केल्यास त्याचा थेट फायदा सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांना होत नाही, असा दावा त्यांनी केला. ‘आपल्यालाही बदलावं लागेल’ व्यवस्था बदलण्याची मागणी करताना केवळ सरकारला दोष देऊन चालणार नाही, तर मतदार म्हणून आपली भूमिकाही बदलावी लागेल, असे दिपके यांनी स्पष्ट केले. लोकशाहीमध्ये नागरिकांची जबाबदारी मोठी आहे. योग्य उमेदवाराची निवड, प्रश्न विचारणे आणि निवडून दिलेल्या प्रतिनिधीला त्याच्या कामाचा जाब विचारणे, हीदेखील नागरिकांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या भवित्यावरून सरकारला सवाल पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत दिपके यांनी संबंधित यंत्रणा आणि सरकारच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी त्यांच्या भवित्यासाठी आंदोलन करत असतील आणि त्यांच्या प्रश्नांमध्ये प्रशासनाकडून काही त्रुटी झाल्या असतील, तर त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. जबाबदारी असलेल्या पदांवर असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या निर्णयांची उत्तरदायित्व स्वीकारावे लागेल. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असताना केवळ पदावर बसून राहणे योग्य नाही, अशी टीका त्यांनी केली. फडणवीसांवरही टीकास्त्र यावेळी अभिजित दिपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. फडणवीस यांनी काही व्यक्तींना महत्त्वाच्या पदांवर नियुक्त केल्याचा आरोप करत त्यांच्या पात्रतेवर दिपके यांनी प्रश्न उपस्थित केले. संबंधित नियुक्त्यांमध्ये मैत्रीला प्राधान्य दिले गेले का, असा सवाल करत त्यांनी ‘फ्रेंड्स विथ बेनिफिट’ असा टोला लगावला. राजकारणातील आर्थिक व्यवहारांवरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. आमदार-खासदारांची खरेदी-विक्री होत असल्याचे आरोप केले जात असतील, तर त्यासाठी पैसा कुठून येतो, याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सरकारच्या निधीवाटपावरही त्यांनी टीका केली. ‘महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला का नेताय?’ महाराष्ट्रातील उद्योग आणि व्यवसाय गुजरातकडे वळत असल्याच्या मुद्द्यावरूनही दिपके यांनी सरकारवर टीका केली. महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाण्याची परिस्थिती निर्माण होत असेल, तर त्याचा थेट परिणाम राज्यातील रोजगारावर होणार आहे. महाराष्ट्रातील व्यवसाय आणि उद्योग गुजरातमध्ये का नेले जात आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील उद्योग महाराष्ट्रातच टिकले पाहिजेत आणि तरुणांना राज्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. उद्योग बाहेर गेल्यास त्याचा फटका स्थानिक अर्थव्यवस्था आणि रोजगाराच्या संधींना बसतो, असेही त्यांनी सांगितले. ‘बाबासाहेबांनी अधिकार दिले, पण आपण त्यांची किंमत विसरलो’ भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या अधिकारांवरही दिपके यांनी भाष्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील नागरिकांना मूलभूत अधिकार दिले; मात्र त्या अधिकारांचे महत्त्व आपण पुरेसे ओळखत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हे अधिकार मिळवण्यासाठी पूर्वीच्या पिढ्यांना संघर्ष करावा लागला. आजच्या पिढीला अनेक अधिकार सहज उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे त्यांची किंमत कमी झाल्यासारखी भावना निर्माण झाली आहे. नागरिकांनी आपल्या मूलभूत अधिकारांबाबत अधिक जागरूक आणि संवेदनशील होण्याची गरज असल्याचे दिपके यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दरम्यान, पुण्यात विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनीही या आंदोलनाला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. त्यानंतर अभिजित दिपके यांनी आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची माहिती घेतली आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. शिक्षण, स्पर्धा परीक्षा, रोजगार आणि प्रशासनातील पारदर्शकता हे प्रश्न केवळ विद्यार्थ्यांपुरते मर्यादित नसून त्यांचा संबंध राज्यातील तरुणांच्या भवितव्याशी आहे. त्यामुळे या प्रश्नांकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन पाहण्याची गरज असल्याचे दिपके यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले. हेही वाचा… ठाकरे बंधूंचा मोर्चा म्हणजे ‘हरवलेली जमीन शोधण्याचा प्रयत्न:देवेंद्र फडणवीसांचा टोला, निवडणुकीतील गोंधळाच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये गडबड झाल्याचा विरोधकांकडून करण्यात येणारा आरोप आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे बंधूंनी काढलेल्या मोर्चावरही फडणवीसांनी टीका करत हा मोर्चा म्हणजे “हरवलेली जमीन शोधण्याचा प्रयत्न” असल्याचं म्हटलं. तसेच विरोधकांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर बोलताना त्यांनी 2024 मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि 2026 मधील SIR प्रक्रियेचा संदर्भ देत विरोधकांच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *