![]()
हिंगोलीतील कपडा गल्ली भागात सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका फटाक्याच्या गोदामाला भीषण आग लागून 11 जण गंभीर जखमी झाले. यापैकी सात रुग्णांना हिंगोली च्या लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार साठी दाखल करण्यात आले. हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने या सर्व रुग्णांवर मोफत उपचार करून सामाजिक संदेश दिला आहे. हिंगोली शहरातील कपडा गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराच्या खाली असलेल्या फटाक्याच्या गोदामाला सोमवारी (ता. 5) रात्री अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. कपडा गल्ली भाग अरुंद रस्त्याचा असल्यामुळे तातडीची मदत मिळणे कठीण असल्याची शक्यता लक्षात घेऊन त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी मिळेल त्या साहित्याने आगीवर पाणी ओतण्यास सुरुवात केली मात्र आग अधिकच भडकली. त्यानंतर पालिकेच्या लहान अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यासह नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले त्यानंतर सुमारे तीन तासानंतर आग आटोक्यात आली. मात्र या घटनेमध्ये आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या 11 जणांना आगीची धग लागली. त्यामुळे ते भाजले गेले. त्यापैकी सात जणांना उपचारासाठी हिंगोलीच्या लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. संकटाच्या या काळात डॉक्टर अखिल अग्रवाल, डॉक्टर मयूर अग्रवाल, डॉ. प्राची अग्रवाल, डॉ. विजया अग्रवाल यांच्यासह लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलच्या पथकाने या सर्व रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार केले आहेत. विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत डॉक्टरांचे पथक सर्व रुग्णांची काळजी घेण्यासाठी तैनात होते. संकटाच्या काळात केवळ व्यावसायिक न राहता माणुसकीला प्राधान्य देत हॉस्पिटलने जखमींवर पूर्णपणे विनामूल्य उपचार केले आहेत. यापूर्वीही विविध संकटांच्या प्रसंगी या हॉस्पिटलने रुग्णसेवा आणि सामाजिक बांधिलकी जोपासत अशीच संवेदनशील भूमिका पार पाडली आहे. हॉस्पिटलच्या या कौतुकास्पद आणि समाजोपयोगी भूमिकेमुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, ही केवळ वैद्यकीय सेवा नसून खरी माणुसकी आणि सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण ठरले आहे.
Source link
हिंगोलीत मानवतेचे दर्शन:आग विझवितांना भाजलेल्या सात रुग्णांवर लक्ष्मी लाइफ केअरमध्ये केले पूर्णपणे मोफत उपचार