Headlines

FDAचा मोठा प्रहार! दुधात डिटर्जंट अन् घातक रसायनांची भेसळ:पुणे-सोलापूरपर्यंत संघटित साखळी उघड, 37 आरोपी निष्पन्न; 25 जणांना अटक




महाराष्ट्रात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत दूध भेसळीची संघटित साखळी उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातून सुरू झालेल्या तपासात दूध भेसळीसाठी स्किम्ड मिल्क पावडर, व्हे पावडर, व्हे परमिएट पावडर, खाद्यतेल, मिश्रक आणि डिटर्जंट यांसारख्या पदार्थांचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान काही दूध नमुन्यांमध्ये डिटर्जंट आणि नॉनिलफेनॉल इथॉक्सिलेट आढळल्याचे अन्न विश्लेषण अहवालातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात मंचर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आतापर्यंत 37 आरोपी निष्पन्न झाले असून, त्यापैकी 25 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींविरुद्ध घोडेगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. उर्वरित 12 आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून, त्यांच्याबाबत तपास सुरू आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने आतापर्यंत 26 अन्न आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्याची अथवा व्यवसाय बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. मंचरमधून उघडकीस आली भेसळीची पद्धत अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर 4 जुलै 2026 रोजी पुणे ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील नवकार डिस्ट्रीब्युटर्सवर कारवाई केली. तपासणीदरम्यान दूध भेसळीसाठी वापरला जात असल्याचा संशय असलेले विविध प्रकारचे व्हे पावडर, व्हे परमिएट पावडर, डिटर्जंट, मिश्रक आणि इतर पदार्थ आढळून आले. या ठिकाणाहून विविध कंपन्यांच्या नावाने असलेले व्हे पावडर, व्हे परमिएट पावडर, डेअरी परमिएट पावडर, चहा-कॉफीमधील वापरासाठीचे क्रीमर्स तसेच भेसळीसाठी वापरले जाणारे डिटर्जंट, मिश्रक आणि व्हे पावडर यांचे नमुने घेण्यात आले. साठाही जप्त करण्यात आला. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 215/2026 दाखल करण्यात आला. तपासातील माहितीनुसार, दूधातील एसएनएफचे प्रमाण वाढवण्यासाठी स्किम्ड मिल्क पावडर, प्रथिनांशी संबंधित घटक वाढवण्यासाठी व्हे पावडर, स्निग्धांश वाढवण्यासाठी खाद्यतेल, तर विविध घटकांचे मिश्रण करण्यासाठी मिश्रक आणि डिटर्जंटचा वापर होत असल्याचे समोर आले. सहा दूध नमुन्यांत डिटर्जंट 6 जुलै 2026 रोजी मंचर येथील आकाश डेअरी फार्मची तपासणी करण्यात आली. तेथे विविध डेअऱ्यांचे दूध पॅक करून विक्री केली जात असल्याचे आढळले. तपासणीदरम्यान सहा दूध नमुने घेण्यात आले. 28 सप्टेंबर 2026 रोजी प्राप्त झालेल्या अन्न विश्लेषण अहवालानुसार सर्व सहा नमुने डिटर्जंटयुक्त आढळले. पूरक अहवालात सर्व सहा नमुन्यांमध्ये अल्फॉक्स-200 इथॉक्सिलेट अर्थात नॉनिलफेनॉल इथॉक्सिलेट आढळल्याचे नमूद करण्यात आले. या नमुन्यांमध्ये स्निग्धांश आणि एसएनएफचे प्रमाणदेखील निर्धारित मानकांपेक्षा कमी आढळले. अथर्व मिल्कचे दूधही असुरक्षित अथर्व मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट इंडस्ट्रीज, शिरवे (पारगाव), आंबेगाव येथे केलेल्या तपासणीत पाश्चराइज्ड गायीचे दूध आणि पाश्चराइज्ड उच्च प्रथिनयुक्त दुधाचे नमुने घेण्यात आले. गायीच्या दुधाच्या नमुन्यात स्निग्धांश 2.5 टक्के आणि एसएनएफ 6.39 टक्के आढळले. याशिवाय डिटर्जंट आढळल्याने हा नमुना निर्धारित मानकांनुसार नसून मानवी सेवनासाठी असुरक्षित असल्याचे अन्न विश्लेषकांनी नमूद केले. पूरक अहवालात राखीव नमुन्यात नॉनिलफेनॉल इथॉक्सिलेट आढळल्याचेही स्पष्ट झाले. भेसळयुक्त दूध थेट सोनाई डेअरीपर्यंत? मंचरमधील तपासाचा विस्तार सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसपर्यंत करण्यात आला. तपासात भेसळयुक्त दूध एका मोठ्या प्रक्रिया डेअरीपर्यंत पोहोचत असल्याची प्रथमदर्शनी पुरवठा साखळी समोर आली आहे. या साखळीत मंचरमधील मुख्य आरोपी सुशांत बबनराव हिंगे यांच्यापासून पुढे सोनू ऊर्फ चैतन्य अरुण घोरपडे, महालक्ष्मी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, योगिनीनाथा मिल्क सप्लायर्स आणि टँकर क्रमांक एमएच-43-बीपी-9597मार्फत इंदापूर डेअरी अँड मिल्क प्रॉडक्ट्स लिमिटेड अर्थात सोनाई डेअरी, गोखळी, इंदापूरपर्यंत दूध पोहोचत असल्याचे तपासात समोर आले आहे. या पुरवठा साखळीला पुष्टी देणारे दूध वितरण चलन आणि टँकर पोहोच चलन तपास यंत्रणेला मिळाले आहेत. याशिवाय आणखी एका स्वतंत्र मार्गानेही भेसळयुक्त दूध सोनाई डेअरीपर्यंत पोहोचत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. माळशिरसमध्ये 16,730 लिटर दूध नष्ट माळशिरस तालुक्यात दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध आढळले. 7 जुलै 2026 रोजी महालक्ष्मी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, पिलिव येथे तपासणी करण्यात आली. दूध नमुन्यात स्निग्धांश 2.7 टक्के, एसएनएफ 7.04 टक्के आणि डिटर्जंट आढळले. त्यामुळे नमुना मानवी सेवनासाठी असुरक्षित घोषित करण्यात आला. दूध नाशवंत असल्याने या ठिकाणी 7,634 लिटर दूध, अंदाजे ₹3,05,360 किमतीचे, नष्ट करण्यात आले. या प्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात 1 ऑक्टोबर 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या प्रकरणात डेलीविश अॅग्रो डेअरी प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड, पिलिव येथे घेतलेल्या दूध नमुन्यात स्निग्धांश 2.5 टक्के, एसएनएफ 7.28 टक्के आणि डिटर्जंट आढळले. या कारवाईत 9,096 लिटर दूध, अंदाजे ₹3,63,840 किमतीचे, नष्ट करण्यात आले. या दोन्ही प्रकरणांत एकूण 16,730 लिटर दूध, सुमारे ₹6.69 लाख किमतीचे, नष्ट करण्यात आले. आर्थिक व्यवहारांचाही तपास मंचर प्रकरणातील तपास केवळ दूध भेसळ करणाऱ्या आस्थापनांपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण पुरवठा साखळीचा केला जात आहे. व्हे पावडर, व्हे परमिएट पावडर, स्किम्ड मिल्क पावडर, मिल्क परमिएट पावडर आणि रासायनिक पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींची चौकशी करण्यात येत आहे. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणातील आर्थिक व्यवहार आणि डिजिटल पुरावेही समोर आले आहेत. त्यामुळे या प्रकरणात स्वतंत्र आर्थिक तपासही सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाचा तपास भेसळयुक्त दूध कोठे सापडले यापुरता मर्यादित न ठेवता, भेसळीचे पदार्थ कोणी पुरवले, कोणी खरेदी केले, त्यांचा वापर कुठे झाला आणि तयार झालेले दूध पुढे कोणाकडे गेले, या संपूर्ण साखळीच्या दिशेने सुरू आहे. कठोर कारवाईचा इशारा दूध हा बालके, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आहारातील महत्त्वाचा घटक असल्याने आर्थिक फायद्यासाठी त्यात अनधिकृत पदार्थ मिसळून नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे. राज्यातील दूध संकलन केंद्रे, शीतकरण केंद्रे, डेअरी, दूध प्रक्रिया उद्योग तसेच दूध भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांच्या पुरवठा साखळीवर प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार आहे. भेसळ करणाऱ्या व्यक्तींपासून अंतिम दूध पुरवठ्यापर्यंत जबाबदार असलेल्या प्रत्येक घटकाची चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारीसाठी 1800222365 या टोल-फ्री क्रमांकावर किंवा अन्न व औषध प्रशासनाच्या तक्रार पोर्टलवर तक्रार करता येईल. हेही वाचा…. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार ‘मराठी भाषा विकास कक्ष’:500 ते 600 चौ.फुटांची जागा देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर 100 टक्के व्हावा आणि शासन व जनता यांच्यातील संवाद अधिक प्रभावीपणे मराठीतून व्हावा, या उद्देशाने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जिल्हा मराठी भाषा विकास कक्ष’ स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने 500 ते 600 चौरस फुटांची जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *