![]()
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता फेब्रुवारी-मार्चमध्येच स्पष्ट झाली होती. त्यावेळी सरकारला आवश्यक उपाययोजना करता आल्या असत्या; मात्र सरकारने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही आणि आज शेतकऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पानकन्हेर येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत राज्य सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली. विजय वडेट्टीवार म्हणाले की, यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण ठरत आहे. पावसाचे प्रमाण कमी राहण्याचे संकेत आधीच मिळाले होते. मात्र त्यानुसार नियोजन करून पाणी, चारा आणि आर्थिक मदतीसंदर्भात ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. परिणामी आज मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी आर्थिक आणि नैसर्गिक संकटाचा सामना करत आहेत. शेतकरी कुटुंबांच्या व्यथा ऐकून वडेट्टीवार भावुक वर्ध्यापासून मराठवाड्यातील विविध भागांचा दौरा करत असल्याचे सांगत विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी कुटुंबांच्या परिस्थितीचा उल्लेख केला. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू आणि त्यांच्या कुटुंबांवर आलेले संकट पाहून मन हेलावून जाते, असे ते म्हणाले. हिंगोली जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेतल्याचे सांगत त्यांनी या कुटुंबाच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. कुटुंबातील वडिलांची दृष्टी गेलेली असताना मुलाने आत्महत्या केली. अशा परिस्थितीत त्या कुटुंबाने पुढील आयुष्य कसे जगायचे, असा प्रश्न उपस्थित करत सरकारने अशा कुटुंबांना तातडीने आधार देण्याची गरज असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. मराठवाड्यातील एका विद्यार्थिनीच्या कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटाचाही त्यांनी उल्लेख केला. शेतकरी आणि सामान्य कुटुंबांवरील आर्थिक ताण वाढत असून त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर आणि भवितव्यावर होत आहे. त्यामुळे ही केवळ शेतीची समस्या नसून ग्रामीण कुटुंबांच्या संपूर्ण जीवनाशी संबंधित गंभीर परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. जलसंधारणाच्या खर्चावर प्रश्नचिन्ह राज्य सरकारच्या जलसंधारणाच्या कामांवरही वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केले. सरकारकडून जलसंधारणासाठी हजारो कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला जातो. “37 हजार कोटी रुपये खर्च केले असतील तर पाणी कुठे जिरले? महाराष्ट्रातील शेतकरी आजही पाण्यासाठी त्रस्त का आहे?” असा सवाल त्यांनी केला. जलसंधारणावर झालेल्या खर्चाचा सरकारने जनतेसमोर हिशेब मांडावा, अशी मागणीही त्यांनी केली. केवळ निधी खर्च झाल्याचे सांगण्यापेक्षा त्यातून प्रत्यक्षात किती जलसाठा निर्माण झाला आणि त्याचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला, याची माहिती सार्वजनिक करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. कर्जमाफीच्या आश्वासनावरून सरकारवर टीका शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही वडेट्टीवार यांनी सरकारला लक्ष्य केले. निवडणुका आल्या की कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याची आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एका गावात सुमारे 600 शेतकरी असताना केवळ 16 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत असेल, तर ही व्यवस्था किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस सरकारच्या काळात तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कर्जमाफी करण्यात आल्याचा उल्लेख करत सध्याच्या परिस्थितीत शेतकरी पुन्हा कर्जाच्या ओझ्याखाली असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. सोयाबीनच्या दरातील घसरणीचा मुद्दा सोयाबीनच्या बाजारभावातील घसरणीवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी सोयाबीनला सुमारे 7,200 रुपये भाव मिळत होता, तो आता सुमारे 5,600 रुपयांपर्यंत घसरल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काळात दर आणखी घसरण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढला आहे, खतांच्या किमती आणि युरियाचा खर्च वाढला आहे, तर दुसरीकडे शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपला उदरनिर्वाह कसा करायचा, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. हेक्टरी 1 लाख रुपये मदतीची मागणी दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून राज्य सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत द्यावी, अशी प्रमुख मागणी वडेट्टीवार यांनी केली. यासोबतच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, सोयाबीनसह सर्व शेतीमालाला योग्य हमीभाव मिळण्याची व्यवस्था करावी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा आणि जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ भाषणापुरते मर्यादित नसून काँग्रेस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. शेतकरी, युवक आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले नाही तर काँग्रेसकडून रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला. “शेतकरी वाचला तर महाराष्ट्र वाचेल. त्यामुळे घोषणा आणि आश्वासनांपलीकडे जाऊन सरकारने प्रत्यक्ष मदत करावी,” अशी मागणी त्यांनी केली. दुष्काळग्रस्त भागातील परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने तातडीने मदतीचे निर्णय घ्यावेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. वर्ध्यात कपाशी पिकाची पाहणी; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट विजय वडेट्टीवार यांनी वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील पारडी येथे कपाशी पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून कपाशी पिकाची सद्यस्थिती, शेतीतील अडचणी, उत्पादन खर्च आणि झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. पिकांची पाहणी करताना शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष समजून घेत त्याबाबत शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कारंजा तालुक्यात आत्महत्या केलेल्या शेतकरी प्रकाश भोरे यांच्या कुटुंबीयांचीही वडेट्टीवार यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. प्रकाश भोरे यांच्याकडे 2 एकर शेती होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले तसेच आई-वडील असा परिवार आहे. भोरे यांच्या आत्महत्येमुळे या कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून वडेट्टीवार यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले. शेतकरी कुटुंबांवर वाढत असलेला आर्थिक ताण, शेतीतील नुकसान आणि उत्पन्नाची अनिश्चितता ही गंभीर बाब आहे. अशा संकटाच्या काळात शासनाने शेतकरी कुटुंबांना केवळ आश्वासनांवर न ठेवता प्रत्यक्ष आर्थिक मदत आणि आधार देणे आवश्यक आहे, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी यावेळी मांडली. हेही वाचा….. FDA चा मोठा प्रहार! दुधात डिटर्जंट अन् घातक रसायनांची भेसळ:पुणे-सोलापूरपर्यंत संघटित साखळी उघड, 37 आरोपी निष्पन्न; 25 जणांना अटक महाराष्ट्रात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत दूध भेसळीची संघटित साखळी उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातून सुरू झालेल्या तपासात दूध भेसळीसाठी स्किम्ड मिल्क पावडर, व्हे पावडर, व्हे परमिएट पावडर, खाद्यतेल, मिश्रक आणि डिटर्जंट यांसारख्या पदार्थांचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान काही दूध नमुन्यांमध्ये डिटर्जंट आणि नॉनिलफेनॉल इथॉक्सिलेट आढळल्याचे अन्न विश्लेषण अहवालातून स्पष्ट झाले आहे. सविस्तर वाचा…
Source link
अल निनोचा इशारा मिळूनही सरकारने उपाययोजना केल्या नाहीत:हेक्टरी 1 लाख रुपये मदत व संपूर्ण कर्जमाफी द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू : विजय वडेट्टीवार