![]()
राज्यातील मोठ्या अंमली पदार्थ प्रकरणात आरोपी असलेल्या संदीप यादव आणि देवेंद्र यादव (दोघेही, दिल्ली) यांना मुंबई उच्च न्यायालयाने ५ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला. या प्रकरणात तब्बल १,८३७.८४ किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले असून, त्याची त्यावेळची अंदाजे किंमत तीन हजार कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. दोघांवर हा ड्रग्जचा साठा लंडनला पाठविण्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप होता. या प्रकरणाची सुरुवात १९ फेब्रुवारी २०२४ रोजी झाली. क्राइम ब्रँच युनिट-१च्या पथकाने सोमवार पेठेत वैभव माने याला ५०० ग्रॅम मेफेड्रॉनसह पकडले. चौकशीत त्याने विश्रांतवाडीतील हैदर शेख याच्याकडून ड्रग्ज आणल्याचे सांगितले. त्यानंतर हैदरकडून १,२५० ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. समर्थ पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(सी), २२(सी) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल झाला. पुढील तपासात कुरकुंभ एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीवर छापा टाकून ६६३ किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. दिल्लीतील कारवाईत ३१९ किलो, तसेच अन्य ठिकाणाहून ६३१ किलो आणि सांगलीतील गोदामातून १४८ किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. प्रकरणाची व्याप्ती वाढल्यानंतर तपास नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान अटक केलेल्या एका आरोपीने ड्रग्ज संदीप यादवच्या कुरिअर कंपनीत देण्यासाठी नेत असल्याचे सांगितल्याचा पोलिसांचा दावा आहे. देवेंद्र यादव हा त्या कंपनीत व्यवस्थापक असल्याचेही तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले. लंडनस्थित आरोपी विरेंदरच्या सांगण्यावरून ड्रग्ज लंडनला पाठविण्याची तयारी असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला होता. पुणे सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर यादव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. केवळ सहआरोपींच्या जबाबावरून अटक करण्यात आली असून, लंडनला ड्रग्ज पाठविल्याचा ठोस पुरावा दोषारोपपत्रात नाही. अटकेची कारणे लेखी देण्यात आली नाहीत तसेच एनडीपीएस कायद्याच्या कलम ४२ मधील प्रक्रियेचे पालन झाले नाही, असा युक्तिवाद अॅड. अतुल आर. पाटील यांनी केला. उच्च न्यायालयाने दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे विशेष सत्र न्यायालयाने दिलेली मुदतवाढ बेकायदेशीर व चुकीची असल्याचे नमूद करत दोन्ही आरोपींना जामीनावर मुक्त करण्याचे आदेश दिले.
Source link
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात दोन आरोपींना जामीन:लंडनला कुरिअरने मेफेड्रॉन पाठविल्याचा आरोप; उच्च न्यायालयाने मुदतवाढ बेकायदेशीर ठरवली