Headlines

कार्ल रॉस यांचा तरुणाईला चित्रपट निर्मितीचा कानमंत्र:मुंबा महोत्सवात म्हणाले, साचेबद्धपणा टाळून कथा सांगा, संस्कृती लपवू नका




निर्माता, लेखक, दिग्दर्शक या नात्यातून तुम्हाला ज्या कथा प्रेक्षकांसमोर आणाव्याशा वाटतात त्या चित्रपटाच्या माध्यमातून आणाव्यात. ठराविक प्रेक्षक डोळ्यासमोर न ठेवता साचेबद्धपणा टाळून चित्रपटाची निर्मिती करा. आपली संस्कृती, जीवनपद्धती लपविण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला जे योग्य वाटते ते करा. तुम्ही लोकांना तुमच्या कथा आवडाव्यात यासाठी सक्ती करू शकत नाही; परंतु जर त्या कथा सांगण्यात उत्कटता असेल तर तुम्ही योग्य मार्ग निवडला आहे, याची खात्री बाळगा. ज्या कामाचा तुम्हाला अभिमान वाटेल ते काम जरूर करा, असा कानमंत्र सव्हाना कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड डिझाईनचे डीन कार्ल रॉस (अमेरिका) यांनी तरुणाईला दिला. मुंबा फिल्म फाउंडेशन आयोजित सातव्या मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बुधवारी (दि. ७) आयोजित कार्यक्रमात कार्ल रॉस बोलत होते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे आयोजित संवादात्मक कार्यक्रमात चित्रपट दिग्दर्शक तनुज भाटिया, चित्रपट लेखक, निर्माता, अभिनेता राजदीप चौधरी यांचा सहभाग होता. त्यांच्याशी श्रुती शेंबेकर यांनी संवाद साधला. महोत्सवाचे आयोजक जय भोसले, व्यवस्थापकीय संचालक अभिषेक अवचार यांनी स्वागत केले. मुळचे भारतीय आणि सध्या ब्रिटन येथे वास्तव्यास असलेले राजदीप चौधरी म्हणाले, चित्रपट क्षेत्रातील तांत्रिक बाबींमध्ये भारत देश खूप प्रगत आहे. त्यामुळे माझ्या प्रत्येक चित्रपटात किमान ७० टक्के तंत्रज्ञ आणि सहाय्यक हे भारतीयच आहेत. अमेरिकेतदेखील बऱ्याच भारतीय व्हिज्युअल इफेक्टस्‌ कलाकारांना मोठ्या प्रमाणात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. कारण ते तांत्रिकदृष्ट्या अतिशय प्रगत आहेत. जुन्या शैलीतील कथा सांगण्याची चित्रपट निर्मितीची पद्धत मला आवडते. त्यामुळे ती शैली मी स्वीकारली आहे, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. तनुज भाटिया म्हणाले, चित्रपट माध्यमात भाषेचे बंधन नसते. हे माध्यम प्रादेशिक क्षेत्रापुरते मर्यादित राहिलेले नाही. जगात कुठेही बसलेली व्यक्ती कोणत्याही प्रकारचा, कोणत्याही भाषेतील चित्रपट बघू शकते. चित्रपट निर्मित करत असताना सुरुवातीस असलेला विचार अनेकदा वेगवेगळी वळणे घेत एका वेगळ्याच टप्प्यावर संपतो. चित्रपट हे माध्यम नेहमीच आठवणींशी संबंधित असते. त्यामुळे बहुतेकदा भूतकाळात काय घडले याची आठवण चित्रपटाच्या माध्यमातून दिली जाते. कष्ट आणि प्रतिभेला नशिबाची साथ मिळाल्यास चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात टिकून राहता येते. कार्ल रॉस म्हणाले, चित्रपट निर्मिती करणे हे कोणा एकट्याचे काम नाही. त्यात अनेक क्षेत्रातील तज्ज्ञांचे सहकार्य आवश्यक असते. अनेक सहकाऱ्यांबरोबर काम करत असताना त्यांच्यातील कौशल्य आत्मसात करण्याची संधी आपल्याला उपलब्ध होते. त्यामुळे या क्षेत्रात सहयोगाला अतिशय महत्त्व आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *