![]()
ऊसाला प्रतिटन 5,500 रुपये दर जाहीर करावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दिशा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बदलली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक रोखून सुरू असलेले आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ऊसाला अपेक्षित दर जाहीर न करताच गाळप सुरू करणाऱ्या साखर कारखान्यांना लक्ष्य करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मागण्यांकडे सरकार आणि साखर कारखानदारांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्यांना आता आंदोलनाची ताकद दाखवून देऊ, अशी भूमिका शेट्टी यांनी मांडली. कोल्हापूर आणि बेळगावदरम्यान कोगनोळी टोलनाक्याजवळ सुरू असलेल्या आंदोलनामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. तब्बल 31 तासांपासून सुरू असलेल्या या आंदोलनानंतरही सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले. त्यामुळे केवळ महामार्ग रोखून आंदोलन करण्याऐवजी थेट साखर कारखान्यांच्या गाळपावर दबाव आणण्याची रणनीती आखण्यात आली आहे. ऊसदर जाहीर न करणाऱ्या कारखान्यांना लक्ष्य यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना प्रतिटन 5,500 रुपये दर मिळावा, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. मात्र, हा दर जाहीर न करताच काही कारखान्यांनी गाळप सुरू केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. अशा कारखान्यांचे कामकाज बंद पाडण्यासाठी कार्यकर्ते मैदानात उतरतील, असा इशारा शेट्टी यांनी दिला. ऊस उत्पादकांच्या मागण्यांवर तोडगा निघण्याआधीच कारखाने सुरू होत असतील, तर आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. साखर कारखान्यांमधून साखरेचा एक कणही बाहेर जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्राही शेट्टी यांनी जाहीर केला. मागणी मान्य न करता एखाद्या कारखान्याने गाळप सुरू ठेवल्यास तेथील साखर गरिबांना वाटून टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला. आंदोलनासाठी दोन पथकांची आखणी आंदोलन अधिक व्यापक करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन पथके तयार केली आहेत. त्यापैकी एक पथक हुबळीच्या दिशेने पायी जाणार असून, 29 ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली आहे. दुसरे पथक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये कार्यरत राहणार आहे. या भागांतील ज्या साखर कारखान्यांनी मागणीनुसार दर जाहीर न करता गाळप सुरू केले आहे, त्यांच्याविरोधात आंदोलन छेडण्याची जबाबदारी या पथकावर असेल. त्यामुळे आगामी काळात ऊसदराच्या प्रश्नावर शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. कारखानदारांशी चर्चेचा प्रयत्न केल्याचा दावा राजू शेट्टी यांनी सांगितले की, आंदोलन सुरू करण्यापूर्वी राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची भेट घेऊन त्यांना आपली भूमिका समजावून सांगितली होती. ऊसदर वाढवण्याच्या प्रश्नावर कारखानदारांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही केली होती. गेल्या सात वर्षांत त्यांना एफआरपीमध्ये अपेक्षित वाढ करून घेता आली नसल्याचा दावा त्यांनी केला. नोव्हेंबरमध्ये ऊस गाळप सुरू केल्यास साखरेचा उतारा अर्थात रिकव्हरी चांगली मिळू शकते आणि त्याचा फायदा ऊस उत्पादकांनाही होऊ शकतो, असे शेट्टी यांनी म्हटले. मात्र, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या किमती वाढल्याने सरकारने कारखाने सुरू करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याने नाराजी महामार्गावर 31 तास आंदोलन करूनही सरकारने मागण्यांची दखल घेतली नसल्याची नाराजी शेट्टी यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना आंदोलनासाठी रस्त्यावर बसावे लागत असताना दुसरीकडे काही कारखाने सुरू होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करून कारखान्यांचे गाळप सुरू ठेवले जात असेल, तर संबंधितांना त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. आता महामार्गावरील आंदोलनाऐवजी साखर कारखान्यांच्या गाळपावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. त्यामुळे ऊसदराच्या मागणीवर सरकार आणि कारखानदार काय भूमिका घेतात, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दराबाबत तोडगा न निघाल्यास राज्यातील साखर कारखान्यांच्या परिसरात आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे आहेत. हेही वाचा… तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात कथित मटका व्यावसायिकाला प्रवेश कसा?:व्हीआयपी दर्शनावरून वाद, आमदाराच्या पीएच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील कथित व्हीआयपी दर्शनावरून नवा वाद निर्माण झाला आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात सोलापूर येथील कथित मटका व्यावसायिकाला देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आल्याचा आणि तेथे दर्शन घेत फोटोसेशन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेशी संबंधित काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मंदिरातील दर्शन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाच्या तक्रारीत एका आमदाराच्या स्वीय सहायकाचे तसेच स्थानिक नगराध्यक्षांचे नाव आल्याने राजकीय वर्तुळातही या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. सविस्तर वाचा…
Source link
राजू शेट्टींचा आंदोलनाचा पवित्रा बदलला:महामार्गावरील ठिय्या थांबवून साखर कारखाने बंद पाडण्याचा इशारा