Headlines

पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड:शिवसेना शिंदे गटाकडून सचिन सानप पुरस्कृत उमेदवार; महायुतीत रंगणार 'मैत्रीपूर्ण लढत'




महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना अधिकृत पत्र काढून आपला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेच्या या निर्णयामुळे आता पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट ‘मैत्रीपूर्ण लढत’ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपकडून या मतदारसंघात कौस्तुभ गावडे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघातील उमेदवारीवरून सुरुवातीपासूनच चुरस होती. शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मंगेश चिवटे यांनी मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी करत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यांना पक्षाकडून एबी फॉर्मदेखील देण्यात आला होता. मात्र, महायुतीच्या धर्माचे पालन करत चिवटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले. दुसरीकडे, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे माजी विशेष कार्य अधिकारी असलेल्या सचिन सानप यांनी ‘शिक्षक मतदारसंघाचा आमदार शिक्षकच हवा’ अशी भूमिका घेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. शिंदेंचा सानप यांना पाठिंबा मंगेश चिवटे यांनी माघार घेतल्यानंतर पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, उदय सामंत आणि रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय सूत्रे फिरली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी सचिन सानप यांना आपला पाठिंबा दिला. अखेर आज शिवसेनेकडून पुणे शिक्षक मतदारसंघात सचिन सानप हे पक्षाचे पुरस्कृत उमेदवार असतील, हे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. भाजप-शिवसेनेत तणावाची शक्यता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने थेट भाजप उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिवसेना आणि भाजपमधील संबंध ताणले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसऱ्या बाजूला, अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेने किरण सरनाईक यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे स्वतः १८ तारखेला अमरावती दौऱ्यावर जाणार असून, तेथे ते विधानपरिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याची शक्यता आहे. पुण्यात आता चौरंगी लढत पुणे शिक्षक मतदारसंघात आता रंगतदार चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर रिंगणात आहेत, तर माजी आमदार दत्तात्रय सावंत हे अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत. भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली असून, शिवसेनेचा पाठिंबा लाभलेले सचिन सानप यांच्यामुळे ही निवडणूक अधिकच अटीतटीची झाली आहे. विशेष म्हणजे, २०२० च्या निवडणुकीत काँग्रेसच्या जयंत आसगावकर यांनी भाजपच्या जितेंद्र पवार यांचा पराभव करत या मतदारसंघावर विजय मिळवला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *