![]()
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज बाद झाल्याने निवडणुकीच्या रिंगणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झालेल्या पडळकरांची आता पुन्हा निवडणुकीत एन्ट्री झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पडळकरांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी पडळकरांना दोन चॉकलेट देत मिश्कील टिप्पणी केली. “गोपीचंद पडळकरांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. मात्र, अभिनंदनासोबतच त्यांनी पडळकरांना बोलण्यापेक्षा कामावर अधिक भर देण्याचा सल्लाही दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने पडळकरांना दिलासा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जत सोसायटी गटातून गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांच्या अर्जाच्या वैधतेवर आक्षेप घेण्यात आल्याने निवडणूक प्रक्रियेत त्यांच्यासमोर कायदेशीर अडचण निर्माण झाली. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानेही त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्याचा निर्णय कायम ठेवला होता. त्यामुळे पडळकरांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. या निर्णयानंतर पडळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढा देणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती. त्यानुसार, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि तेथून त्यांना दिलासा मिळाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पडळकर यांच्यासाठी जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, निवडणुकीतील राजकीय चुरस वाढण्याची शक्यता आहे. दोन चॉकलेट देत चंद्रकांत पाटलांचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोपीचंद पडळकर यांचे अभिनंदन करताना चंद्रकांत पाटील यांनी त्यांना चॉकलेट देऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी पडळकरांच्या राजकीय आक्रमक शैलीचा उल्लेख करत मिश्कील भाष्य केले. पडळकर यांच्या ताकदीची आणि त्यांच्या राजकीय डावपेचांची चर्चा करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही संदर्भ त्यांनी दिला. पडळकर जिल्हा बँकेत आल्यावर पुढे काय घडणार, याबाबतही पाटील यांनी सूचक टिप्पणी केली. कसलेला पैलवान ज्याप्रमाणे एकाच वेळी आठ ते दहा जणांना लोळवू शकतो, त्याप्रमाणे पडळकरांची राजकीय ताकद असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. मात्र, याच वेळी पाटील यांनी पडळकरांना संयम राखण्याची सूचनाही केली. “बोलणे कमी आणि काम जास्त करा,” असा सल्ला मुख्यमंत्र्यांनीही पडळकरांना दिल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणात आक्रमकता आणि उत्साह महत्त्वाचा असला, तरी त्यासोबत कामातून परिणाम दाखवणेही आवश्यक असल्याचा संदेश त्यांच्या वक्तव्यातून देण्यात आला. ‘उन्माद नको, उत्साह हवा’; पडळकरांना कानपिचक्या गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असले, तरी या यशानंतर अतिआत्मविश्वास नको, असा अप्रत्यक्ष संदेश चंद्रकांत पाटील यांनी दिला. “उन्माद नको, उत्साह हवा,” अशा शब्दांत त्यांनी पडळकरांना कानपिचक्या दिल्या. पडळकर हे त्यांच्या आक्रमक राजकीय भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांची पुन्हा एन्ट्री झाल्यानंतर आता ते कोणती रणनीती आखतात आणि निवडणुकीत त्यांची भूमिका काय राहते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या मिश्कील टिप्पणीमुळे या घडामोडींना आणखी राजकीय रंग मिळाला आहे. पडळकरांच्या उमेदवारीवर नेमका आक्षेप काय होता? गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारी अर्जाला आव्हान देताना त्यांच्या सहकारी संस्थांमधील सभासदत्व आणि संचालकपदाच्या अनुभवावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. कुणीकोणूर सर्वसेवा सहकारी सोसायटीतील त्यांचे सभासदत्व तसेच निंबवडे ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेतील संचालकपदाचा अनुभव निवडणुकीसाठी ग्राह्य धरता येतो का, हा वादाचा मुख्य मुद्दा होता. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपविधींनुसार संबंधित संस्थेचे किमान दोन वर्षांचे सभासदत्व आणि व्यवस्थापन समितीवर एक वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा होता. पडळकर यांनी 20 फेब्रुवारी 2026 रोजी कुणीकोणूर येथे जमीन खरेदी केली असल्याचा मुद्दा उपस्थित करत, त्यापूर्वी त्यांना संबंधित सोसायटीचे सभासदत्व कसे मिळाले, असा प्रश्न याचिकेत विचारण्यात आला होता. तसेच, निंबवडे ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे कार्यक्षेत्र केवळ संबंधित गावापुरते मर्यादित असल्याने तेथील सभासदत्व आणि संचालकपदाचा अनुभव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पात्रतेसाठी ग्राह्य धरता येतो का, यावरही आक्षेप घेण्यात आला होता. याच मुद्द्यांवरून पडळकरांच्या उमेदवारीची वैधता न्यायालयात आव्हानित करण्यात आली. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पडळकरांना निवडणुकीत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीचा आणि राजकीय रणनीतीचा किती प्रभाव पडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हेही वाचा… बीडमध्ये चौथीच्या 4 विद्यार्थिनींसोबत शिक्षकाचे संतापजनक कृत्य:अश्लील वर्तन आणि विनयभंगाचा आरोप, पालकांच्या तक्रारीनंतर अटक जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावात शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आली आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या चौथीच्या 4 विद्यार्थिनींसोबत शिक्षकाने गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थिनींसमोर कपडे काढणे, त्यानंतर अश्लील प्रकार करणे आणि त्यांना अयोग्य पद्धतीने स्पर्श करणे, असे आरोप संबंधित शिक्षकावर करण्यात आले आहेत. या प्रकरणी पालकांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. घटनेची माहिती समोर आल्यानंतर गावात संतापाचे वातावरण असून, आरोपी शिक्षकाला कठोर शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सविस्तर वाचा…
Source link
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात! चंद्रकांत पाटलांची मिश्कील टिप्पणी:दोन चॉकलेट देत म्हणाले, ‘बोलणे कमी आणि काम जास्त करा’