Headlines

'आमचा विजय मुश्रीफांनी खिलाडूवृत्तीने स्वीकारायला हवा होता':गोकुळच्या निकालानंतर सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांसह महायुतीला टोला, फेरमतमोजणीवरूनही सुनावले




गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनेलने 13 जागा जिंकत महायुतीला धक्का दिला. या निकालानंतर सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ‘आमचा जो विजय झालेला आहे, तो मुश्रीफ साहेबांनी आणि चंद्रदीप नरकेंनी खिलाडूवृत्तीने स्वीकारायला पाहिजे होता. जो पराभव झालेला आहे, तोही त्यांनी स्वीकारायला पाहिजे होता,’ असे म्हणत सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ आणि महायुतीच्या नेत्यांना टोला लगावला. फेरमतमोजणीच्या अर्जामुळे निकाल जाहीर होण्यास जवळपास 3 तासांचा विलंब झाल्याचेही त्यांनी सांगितले. गोकुळ ही कोल्हापूरची अस्मिता असून, त्याचे निर्णय कोल्हापुरातच झाले पाहिजेत, ही आमची भूमिका दूध उत्पादकांना पटली, असा दावाही त्यांनी केला. गोकुळमध्ये सतेज पाटील यांच्या पॅनेलला 13 जागा गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनेलने 13 जागांवर विजय मिळवला, तर महायुतीला 12 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत दोन्ही बाजूंमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होती. मात्र, फेरमतमोजणीच्या मागणीमुळे निकाल जाहीर होण्यास विलंब झाला. अखेर निकाल स्पष्ट झाल्यानंतर सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत दूध उत्पादक आणि ठरावधारकांचे आभार मानले. ‘कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी आम्हाला जे बहुमत दिले, त्याबद्दल साडेपाच लाख शेतकऱ्यांसह ठरावधारकांचे मी आभार मानतो. ही निवडणूक दूध उत्पादक आणि ठरावधारकांच्या माध्यमातून जिंकणार, असे आम्हाला वाटत होते. सर्वसामान्य लोकांनाही गोकुळमध्ये एकमुखी कारभार असावा, असे वाटत होते. तोच कौल आम्हाला मिळाला आहे,’ असे सतेज पाटील म्हणाले. फेरमतमोजणीच्या अर्जामुळे निकालाला 3 तासांचा विलंब गोकुळच्या निकालानंतर फेरमतमोजणीवरून सतेज पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांवर टीका केली. पराभव झालेल्या उमेदवारांनी तो खिलाडूवृत्तीने स्वीकारायला हवा होता, असे त्यांनी म्हटले. हसन मुश्रीफ आणि चंद्रदीप नरके यांच्या बाजूच्या उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केल्यामुळे निकाल जाहीर होण्यास विलंब झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘ज्यांचा पराभव झाला होता, त्यांनी तो स्पोर्टिंगली घ्यायला पाहिजे होता. दोन्ही उमेदवारांनी फेरमतमोजणीचा अर्ज केला. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियमाप्रमाणे निर्णय घेतला. मतमोजणीच्या वेळी बाद झालेली मते बाजूला काढण्यात आली होती. आमच्या आणि त्यांच्या प्रतिनिधींनीही ती बाद असल्याचे मान्य केले होते. त्यानंतर उर्वरित मतमोजणी झाली. फेरमतमोजणीसाठी कायद्याला धरून वैध कारण नसल्यामुळे त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले,’ असे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, ‘मुश्रीफ साहेबांनी आणि चंद्रदीप नरकेंनी हा अर्ज द्यायला नको होता. आमचा झालेला विजय त्यांनी खिलाडूवृत्तीने स्वीकारायला हवा होता. त्यांच्या अर्जामुळे जवळपास 3 तास गेले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आलेल्या अर्जावर कायदेशीर विचार करून निर्णय घेणे अपेक्षित असते. त्यांनी त्याप्रमाणे निर्णय घेतला. त्यामुळे मी त्यांना दोष देत बसणार नाही.’ ’98 मते बाद झाली नसती, तर आमचे आणखी उमेदवार निवडून आले असते’ गोकुळच्या निवडणुकीत बाद झालेल्या मतांचा मुद्दाही सतेज पाटील यांनी उपस्थित केला. जनरल गटातील 98 मते अवैध ठरल्यामुळे त्यांच्या पॅनेलच्या काही उमेदवारांना फटका बसल्याचा दावा त्यांनी केला. ‘जनरलमधील 98 मते अवैध ठरली. त्यापैकी 20 मते आम्हाला शिट्टी चिन्हावर दिलेली होती. एक मत दुर्दैवाने दुसरीकडे दिले गेले. ही मते अवैध ठरली नसती, तर आमचे आणखी 5 ते 8 उमेदवार निवडून आले असते. मतांची बेरीज पाहिली, तर लोकांचा कौल पूर्णपणे आमच्या पॅनेलच्या बाजूने होता,’ असे ते म्हणाले. अवैध मतांमुळे त्यांच्या पॅनेलला अपेक्षित जागा मिळू शकल्या नसल्याचे सांगत, दूध उत्पादकांचा मोठा पाठिंबा आपल्याला मिळाल्याचा दावा त्यांनी केला. ‘गोकुळ ही कोल्हापूरची अस्मिता; निर्णय इथेच झाले पाहिजेत’ गोकुळ निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करताना सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या अस्मितेचा मुद्दा मांडला. मुंबईत झालेल्या राजकीय चर्चा आणि निर्णय मतदारांना मान्य नव्हते का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर बोलताना त्यांनी गोकुळचे निर्णय कोल्हापुरातच झाले पाहिजेत, ही आपली भूमिका असल्याचे सांगितले. ‘आम्ही हाच मुद्दा घेतला होता की, गोकुळ ही कोल्हापूरची अस्मिता आहे. गोकुळबाबतचे निर्णय कोल्हापुरात झाले पाहिजेत. आमची ही भूमिका दूध उत्पादकांना पटली. गोकुळमध्ये एकमुखी कारभार हवा, असा कौल आम्हाला मिळाला आहे. गोकुळची मालकी कोल्हापुरातील दूध उत्पादकांकडेच राहावी, ही त्यांची अपेक्षा होती,’ असे सतेज पाटील म्हणाले. महायुतीने आधी निवडणुकीच्या काळात एकमेकांविरोधात भूमिका घेतली आणि नंतर एकत्र येण्याचा निर्णय घेतला. हा अंतर्गत वाद मतदारांना पटला नसल्याचेही त्यांनी सूचित केले. शपथा आणि भावनिक आवाहनांचा परिणाम निकालातून स्पष्ट : सतेज पाटील गोकुळ निवडणुकीदरम्यान शपथा, अनाभाका आणि भावनिक आवाहनांद्वारे मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याबाबत विचारले असता, सतेज पाटील यांनी त्यावर टीका केली. ‘शपथांचा परिणाम काय झाला आणि काय नाही, हे निकालावरून स्पष्ट होत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात, विशेषतः कोल्हापुरात सत्तेत असलेले लोक असे करत होते, हे दुर्दैवी आहे. त्यांना या निकालातून चांगली चपराक बसली, असे म्हणायला हरकत नाही,’ असे ते म्हणाले. महायुतीकडून 25-0 असा विजय मिळवण्याचे दावे करण्यात आले होते. सतेज पाटील यांची एकही जागा निवडून येणार नाही, असे वक्तव्य केल्याचा संदर्भही पत्रकारांनी दिला. त्यावर उत्तर देताना, ‘ते कालपर्यंत बोलत होते. आता निकाल त्यांना मिळालेला आहे. या जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी त्यांना उत्तर दिले आहे,’ असे पाटील म्हणाले. शौमिका महाडिक, नावेद मुश्रीफ आणि अरुण डोंगळे यांच्या पराभवावर काय म्हणाले? या निवडणुकीत शौमिका महाडिक, नावेद मुश्रीफ आणि अरुण डोंगळे यांच्यासह काही प्रमुख नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामागील कारणांबाबत विचारले असता, सत्तेत असल्यामुळे सर्व काही आपलेच आहे, असे गृहीत धरण्याची भूमिका काही जणांनी घेतली असावी, असे सतेज पाटील यांनी म्हटले. ‘सत्तेत असलो आणि निवडणुकीला उभे राहिलो, की सर्व काही आपलेच आहे, असे काही लोक गृहीत धरून चालले होते. विशेषतः अरुण डोंगळे यांनी चेअरमन निवडीच्या वेळी जे राजकारण केले, त्याचा फटका त्यांना बसला असावा. आबाजी माझ्याबरोबर होते; मात्र शेवटी ते दुसऱ्या बाजूला गेल्यामुळे त्याचाही परिणाम झाला असावा. या दोघांनी दोन पावले मागे राहून मार्गदर्शकाची भूमिका घेतली असती, तर अधिक योग्य झाले असते,’ असे पाटील म्हणाले. ‘निवडणूक संपली; आता जाहीरनाम्याची अंमलबजावणी करणार’ गोकुळ निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर आता टीका-टिप्पणी करण्यापेक्षा दूध उत्पादकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. साडेपाच लाख शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून संचालक मंडळ काम करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. ‘मला यश मिळाले आहे. आता मला माझा जाहीरनामा लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. निवडणूक संपली आहे. गोकुळशी संबंधित सर्व डेअऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आमचे संचालक मंडळ घेईल. ही निवडणूक आम्ही साडेपाच लाख शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लढवली. यापुढेही आमचे संचालक मंडळ त्याच भूमिकेतून काम करेल,’ असे त्यांनी सांगितले. येत्या 6 महिन्यांपासून वर्षभराच्या कालावधीत जाहीरनाम्यातील आश्वासनांची अंमलबजावणी झालेली दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. चेअरमन निवडीची प्रक्रिया नियमांनुसार होणार निवडणुकीपूर्वी चेअरमनपदाबाबत केलेल्या घोषणेची अंमलबजावणी कधी होणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर सतेज पाटील यांनी चेअरमन निवडीची प्रक्रिया नियमानुसार होणार असल्याचे सांगितले. ‘नियमाप्रमाणे तारीख निश्चित करावी लागेल. जिल्हा उपनिबंधकांना (DDR) पत्र दिल्यानंतर निवडीची तारीख लागेल. त्यानंतर चेअरमन निवडला जाईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गोकुळच्या निवडणुकीनंतर जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र, ‘अजून जिल्हा बँकेची निवडणूक लागू दे. आजच सगळ्या गोष्टी बोलायला नकोत. त्यावर नंतर चर्चा करेन,’ असे सांगत त्यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले. ‘महायुतीतील वाद त्यांनाच माहीत’ गोकुळ निवडणुकीदरम्यान महायुतीतील अंतर्गत वादाचाही परिणाम निकालावर झाला का, असा प्रश्न सतेज पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी महायुतीतील नेत्यांनी एकत्र यायचेच होते, तर आधी वाद का केला, असा सवाल उपस्थित केला. ‘महायुतीतील वाद त्यांचा त्यांना माहीत आहे. तुम्ही एकत्रच येणार होता, तर मग वाद का केला? हा प्रश्न लोकांच्या मनात होता. कदाचित हा वाद लोकांना पटला नसावा,’ असे ते म्हणाले. गोकुळ निवडणुकीतील विजयामुळे सतेज पाटील यांच्या गटाचे बळ वाढले असून, दूध उत्पादकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी आता नव्या संचालक मंडळावर असेल. निकालानंतर सतेज पाटील यांनी विरोधकांवर टीका करण्यापेक्षा दूध उत्पादकांना न्याय देण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले. हेही वाचा…. ‘गोकुळ’मध्ये महायुतीचा पराभव, मुश्रीफांच्या मुलालाही धक्का:‘शेवटपर्यंतची भांडणे अन् नंतरची युती लोकांना आवडली नसावी’, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रतिष्ठेची ठरलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने महायुतीला धक्का देत 13-12 अशा फरकाने विजय मिळवला. या निवडणुकीत महायुतीने विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र, अखेर मतदारांनी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला कौल दिला. विशेष म्हणजे, महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व करणारे मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र आणि गोकुळचे विद्यमान अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. या निकालानंतर हसन मुश्रीफ यांनी आपली भूमिका स्पष्ट करत पराभवामागील संभाव्य कारणांवर भाष्य केले. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *