Headlines

पुणे जिल्ह्यात 25 हजार एकरावर चारा उत्पादन:साडेपाच लाख टन उत्पादनाचे लक्ष्य; सिंचन असलेल्या शेतकऱ्यांना 100 टक्केअनुदानावर बियाणे




संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने २५ हजार एकर क्षेत्रावर चारा उत्पादनाचे नियोजन केले आहे. यातून सुमारे साडेपाच लाख टन चारा उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेला चारा अवघ्या तीन महिन्यांसाठी पुरेल इतकाच असल्याने चारा उत्पादन वाढविण्यासह त्याची साठवण आणि संवर्धन करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. चारा टंचाई जाणवणाऱ्या अन्य जिल्ह्यांनाही गरजेनुसार पुरवठा करण्याचे नियोजन आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना चारा लागवडीसाठी शंभर टक्के अनुदानावर बियाणे देण्यात येणार आहे. बियाणे वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या आठ ते दहा दिवसांत बियाणे उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर तालुकानिहाय नियोजनानुसार वितरण केले जाणार आहे. मुरघास निर्मितीवरही भर जिल्ह्यात सुमारे १८.७ लाख पशुधन असून, त्यासाठी पुरेशा आणि पौष्टिक चाऱ्याची उपलब्धता राखण्याचे आव्हान आहे. वैयक्तिक शेती, गटशेती आणि सिंचनाखालील क्षेत्रात चारा लागवडीला प्राधान्य दिले जाणार आहे. हिरव्या चाऱ्याचे उत्पादन वाढविण्याबरोबरच उपलब्ध चारा दीर्घकाळ टिकवण्यासाठी मुरघास निर्मितीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात प्रात्यक्षिके आणि शेतकरी मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये चारा साठवण, मुरघास तयार करण्याची पद्धत, चाऱ्याची पौष्टिकता टिकवणे आणि जनावरांना आवश्यक खनिजद्रव्ये व पूरक आहार देण्याबाबत मार्गदर्शन केले जाईल. ग्रामपंचायती, शेतकरी आणि पशुपालकांचा या उपक्रमात सहभाग घेतला जाणार आहे. अन्य जिल्ह्यांनाही पुरवठा चारा उत्पादनातून जिल्ह्याची गरज भागविण्यासोबतच राज्यातील टंचाईग्रस्त जिल्ह्यांना मागणीनुसार चारा पुरवण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. बियाणे वितरणापासून लागवड आणि उत्पादनापर्यंत नियमित देखरेख ठेवण्यात येणार आहे. चाऱ्याची उपलब्धता वाढवून संभाव्य दुष्काळात पशुपालकांवरील संकट कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *