![]()
येरवड्यातील चित्रा चौक परिसरात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिक प्रदीप लक्ष्मण परदेशी (वय ६९) यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नेत्या आणि विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी तातडीने संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणी त्यांनी राज्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिवसेनेचे पुणे शहर संघटक आनंद गोयल यांनी दिलेल्या निवेदनानुसार, चित्रा चौक परिसरात पुणे महापालिकेच्या मलनिःसारण विभागामार्फत गेल्या सहा महिन्यांपासून ड्रेनेजचे काम सुरू आहे. या कामासाठी सुमारे १० ते १५ फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. १७ ऑक्टोबर रोजी या खड्ड्यात पडल्याने परदेशी गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी आवश्यक मजबूत अडथळे, धोक्याचे सूचना फलक, परावर्तक चिन्हे आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था नव्हती. स्थानिक नागरिकांनी यापूर्वी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणी गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी संबंधित अधिकारी, पोलीस आणि महापालिका प्रशासनाची संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली आहे. संबंधित ठेकेदार व अन्य जबाबदार व्यक्तींविरुद्ध कायद्यानुसार गुन्हा नोंदवावा. तपासातील पुराव्यांच्या आधारे सदोष मनुष्यवधाच्या तरतुदी लागू होतात का, याची पडताळणी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. मृताच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत व नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी. शहरातील सर्व सुरू असलेल्या रस्ते खोदकाम आणि ड्रेनेज कामांचे सुरक्षा परीक्षण करून धोकादायक ठिकाणी तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच प्राथमिक कार्यवाहीचा अहवाल तीन दिवसांत सादर करावा, अशी मागणीही गोऱ्हे यांनी केली आहे.
Source link
येरवड्यात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू:दोषींवर कठोर कारवाई करा, ठेकेदाराला काळ्या यादीत टाका: नीलम गोऱ्हे यांची मागणी